मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रींगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. विविध तपास करण्यासाठी ईडीने कोठडी वाढवून मागवली होती. मात्र कोर्टाने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुली आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. काल सोमवार रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची सुमारे १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली.
आज सकाळी अनिल देशमुख यांना कोर्टात हजर करण्यात आले. अनिल देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांना जोरदार बाजू मांडली. अखेर कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. यामुळे अनिल देशमुख याची दिवाळी आता कोठडीतच जाणार आहे. देशमुख यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना अनेक आजार आहेत. त्यामुळे ईडी कोठडी देण्यात येऊ नये”, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी मांडला. मात्र, कोर्टाने हा युक्तीवाद मान्य केला नाही.
अनिल देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र ते ईडीसमोर आले नव्हते. अनेक दिवसांनंतर ते प्रथमच काल सोमवारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्या वेळी त्यांच्या सोबत त्यांचे वकीलही होते. दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.