मंद्रुपमध्ये विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न, मंद्रूपला एमआयडी काढण्यासाठी साथ द्या – आ. सुभाष देशमुख
सोलापूर : जनतेने आपल्याला दोनवेळा भरघोस मतांनी निवडून दिले, त्या ऋणातून उतराई म्हणून मंद्रूपसह तालुक्याचा विकास साधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गावात चार वर्षांत कोट्यवधींची विकासकामे केली. आगामी काळात मंद्रूपला खासगी बाजार समिती काढू,औद्योगिक वसाहत उभारू यासाठी मंद्रूपकरांनी साथ द्यावी, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी येथे बोलताना केले.
ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि विकासकामाचे लोकार्पण सोहळा आ. देशमुख यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होत. यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हनुमंत कुलकर्णी, पॅनेल प्रमुख मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, सरपंच कलावती खंदारे, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, ग्रामपंचायत सदस्य नितीन रणखांबे, दयानंद ख्याडे, दत्तात्रय देशमुख, सोमनिंग मुगळे, हर्षवर्धन देशमुख, रेवणसिद्ध म्हेत्रे, सिध्दलिंग म्हेत्रे, सुनिल रणखांबे, चिदानंद घाले, अतुल गायकवाड, यतीन शहा, शाकीर पटेल आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, मंद्रूपकरांनी आम्हाला सत्ता देऊन एक संधी दिली त्या संधीचे सोने आमच्या पदाधिकार्यांनी केले असून कोट्यावधींचे विविध विकासकामे झाल्याने मनास समाधान वाटते. मोहोळ मंद्रूप-औराद-वळसंग-तांदूळवाडी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला, पुढे चौपदरीकरण होईल. मंद्रूपला ट्रामा केअर सेंटर मंजूर केले,तेही लवकरच मार्गी लागेल. सीना-भीमा जोडकालव्यास मंजुरी घेतली, वडापूर येथे बॅरेजेस मंजूर केले, मंद्रूपला औद्योगिक वसाहत मंजूर आहे. यासाठी शेतकर्यांनी आपल्या जमिनी औद्योगिक वसाहतीस देऊन सहकार्य करावे.
यावेळी मुगळे यांनी आ. देशमुख व 14 व 15व्या वित्त आयोगातून विकासकामे केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रस्ताविक सरपंच खंदारे यांनी केले.
राज्य सरकारला विकासाची दृष्टी नाही
आज महाविकास आघाडी सरकारकडून कोणतीच विकासकामे झाले नाहीत. मुख्यमंत्री सहायत्ता निधी बंद करून गरिबाची चेष्टाच या सरकारने केला आहे. हमीभाव, पीक खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत, अनेक योजना बंद केल्या आहेत. या सरकाराकडे विकासाची दृष्टी नाही. त्यामुळे तालुक्याचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले.