बुलढाणा : बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. या विनंतीनंतर शिंगणे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आंदोलन स्थगित केले. आंदोलन दरम्यान तुपकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
दि.20 नोव्हें.2021 गावबंद आंदोलनासंदर्भात आवाहन… pic.twitter.com/2XMU3Khn6t
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) November 19, 2021
पालकमंत्र्यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तुपकरांच्या मागण्यांबद्दल २० मिनिटे चर्चा केली. त्यातून २४ नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक लावण्याचा निर्णय झाला आहे. तुपकरांना या बैठकीचे निमंत्रण तातडीने द्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यानुसार पत्र घेऊनही पालकमंत्री सकाळी साडेनऊच्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यांनी रविकांत तुपकर यांना उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देऊन अन्नत्याग मागे घेण्याबद्दल विनंती केली. कोणतीही सोयापेंड देशात आयात करणार नाही, असा शब्द केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राजू शेट्टी यांना दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी तुपकरांना दिली.
सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा, सोयाबीनवरील जीएसटी रद्द व्हावा, आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केले होते. यावर, सरकार तात्काळ आपल्या सोयाबीन कापूस उत्पादक संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्याविषयी तातडीने मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक बोलावली आहे व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर कशा होतील, या पद्धतीने निर्णय घेणार असल्याचे शिंगणे यांनी सांगितले.
दरम्यान तुपकरांची प्रकृती खालावल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदारांची जीप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.