सोलापूर, दि. 20- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्यांचा संप आणि हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पुढील चार-पाच दिवसांच्या पावसाच्या अंदाजामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएच.डी प्रवेश (पेट-8) मौखिक परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हाएकदा बदल करण्यात आला असून त्यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पेट-8- पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या विविध 36 विषयांच्या मौखिक परीक्षेचे आयोजन सुरुवातीला दि. 16 ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये विद्यापीठात ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुढे ढकलून दि. 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मौखिक परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासंदर्भाची संपूर्ण तयारी संशोधन विभागाच्यावतीने करण्यात आली होती. यात एकूण 1300 उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून परीक्षार्थी यासाठी हजर राहणार होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्याने विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुरळीत नाही. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसासंदर्भात हाय अलर्ट सांगितलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता उपस्थित राहण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पीएच. डी प्रवेशाची मौखिक परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी दिली.
आता सुधारित वेळापत्रकानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश मौखिक परीक्षा दि. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी दिली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित परीक्षार्थींनी मौखिक परीक्षेस हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.