ग्रामीण भागातील श्रोत्यांमुळे आकाशवाणीची लोकप्रियता टिकून, कुरनूर दत्त मंदिर समिती तर्फे वृत्तनिवेदक मनोज क्षिरसागर यांचा सत्कार
अक्कलकोट, दि.२५ : ग्रामीण भागातील श्रोते हे आकाशवाणी माध्यमाचे बलस्थान आहेत त्यांच्यामुळेच आज या माध्यमाची विश्वासहर्ता आणि लोकप्रियता टिकून आहे, असे प्रतिपादन पुणे आकाशवाणी केंद्राचे मुख्य वृत्तनिवेदक मनोज क्षिरसागर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे श्री दत्त मंदिर समितीच्यावतीने आयोजित ग्रामस्थांशी सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कुरनूर येथील श्री दत्त मंदिर स्पिकरवरून रोज सकाळी स्पिकरवरून आकाशवाणीचे बातमीपत्र ऐकवले जातात त्या अनुषंगाने क्षिरसागर यांनी गावाला सदिच्छा भेट दिली आणि या उपक्रमाची माहिती घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच व्यंकट मोरे हे होते.
यावेळी व्यासपीठावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, अक्कलकोटचे मुख्याधिकारी सचिन पाटील, दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे, ह.भ.प आबा महाराज कुरनूरकर, उपसरपंच आयुब तांबोळी, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे,विनोद मोरे उपस्थित होते. पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले,श्रोत्यांच्या बातम्यांच्या बाबतीत गरजा पूर्ण करणे हे आकाशवाणीचे कर्तव्यच आहे. याची पुरेपूर जाणीव आम्हाला असून रोज तुम्हाला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न आमचा असतो त्यात अनेक वेळा वेगवेगळे उपक्रम देखील आम्ही राबवत असतो. हे करत असताना भाषेचे प्रमाणीकरण जपण्याबरोबरच अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला बातमी समजावून सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक निवेदकाचा असतो. त्यामुळे पुणे आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या बातमीपत्राचा दर्जा चांगला आहे.
आमचे सर्वच वृत्तनिवेदक हे चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून या माध्यमाची विश्वासहर्ता आजही कायम आहे.आज सोशल मीडिया, दृकश्राव्य माध्यमाच्या स्पर्धेत देखील आकाशवाणी आपले स्थान कायम ठेवून आहे. काळाबरोबर आकाशवाणीमध्ये देखील अनेक बदल झालेले आहेत त्याचा स्वीकार श्रोत्यांनी देखील केलेला आहे, असेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी दत्त मंदिर समितीने राबविलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ग्राम
सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याच्या संदर्भात ग्रामपंचायत व गावकऱ्यांना सूचना केल्या तसेच गावातील अवैध धंदे यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गावकर्यांनी पुढाकार घ्यावा,त्यासाठी पोलिस प्रशासन योग्य ते सहकार्य करील ,अशी ग्वाही दिली.
मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेत उतरावे, त्यांना यश नक्की मिळेल .मी देखील ग्रामीण भागातून आलेलो आहे त्यामुळे कमीपणा वाटून घ्यायचे कारण नाही. युवकानीं कष्टाची तयारी ठेवल्यास यशाचा सुवास दरवळल्याशिवाय राहणार नाही,असेही त्यांनी सांगितले. सरपंच व्यंकट मोरे यांनीही गावच्या विकासाबाबत नव्या संकल्पना मांडल्या आणि पोलिस प्रशासनास व्यसनमुक्त गाव या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. दरम्यान मंदिराच्या या सगळ्या उपक्रमात योगदान देत असलेल्या मंदिराचे पुजारी धोंडीबा धुमाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी गोपनीय शाखेचे धनराज शिंदे, भागवत पोतदार, वैशाली क्षिरसागर, तुकाराम जावीर, परशुराम बेडगे, दिगंबर जगताप, लक्ष्मण बेडगे, लक्ष्मण शिंगटे, अशोक काळे, अप्पू काळे, मोहन शिंदे, ज्ञानेश्वर बनसोडे, सचिन पवार आदी मान्यवरांसह कुरनूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.