ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर येथील हजरत पीर सातू सय्यद बाबांची यात्रा उत्साहात

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातु सय्यद बाबांची यात्रा
मोठ्या भक्तिमय वातावरणात शनिवारी पार पडली. मागच्या तीन दिवसांपासून ही यात्रा सुरू होती. सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेला अक्कलकोट तालुक्यात वेगळे महत्त्व आहे.

पहिल्या दिवशी गुरुवारी गंध अर्थात घोड्याची मिरवणूक, दुसऱ्या दिवशी नैवेद्य, दंडवत घालणे तसेच शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या कुस्त्या आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवारी संध्याकाळी सरपंच व्यंकट मोरे मित्र मंडळातर्फे ‘लावण्यरंग ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, सरपंच व्यंकट मोरे, सिद्धार्थ गायकवाड, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धाराम भंडारकवठे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शनिवारी राहुल काळे मित्रमंडळातर्फे ‘लावण्यखणी’  या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,पक्षनेते महेश हिंडोळे, बाळा शिंदे, सागर काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
शनिवारी दुपारी चार वाजता माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुस्त्याचा कार्यक्रम पार पडला.

सलग दोन वर्ष यात्रा पार पडली नव्हती. यावर्षी परगावाहून नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते.पण त्यात एसटीचा संप होता.त्यामुळे मिळेल त्या खाजगी वाहनाने सातू सय्यदबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तरीही एसटीच्या संपाचा काही अंशी परिणाम हा यात्रेवर दिसून आला.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने यात्राकाळात तीन दिवस अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त लावण्यात आला होता.यात्रा पंच कमिटीने ही यात्रा यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन

यात्रेला पुणे, मुंबई, गुलबर्गा, सोलापूर या परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात आले होते. या यात्रेत हिंदू – मुस्लिम ऐक्याचे दर्शन लोकांना घडले.अनेक वर्षांपासून ही परंपरा ग्रामस्थांनी कायम जपली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!