‘प्रिसिजन गप्पां’ची यंदा ‘ऑनलाईन’ दिवाळी; ६ ते ८ नोव्हेंबर २०२० दरम्यान होणार प्रक्षेपण,ख्यातनाम पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी गप्पा आणि गाणी,यंदाचा ‘सामाजिक पुरस्कार’ : गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद व प्रार्थना फाउंडेशन
सोलापूर,दि.२ : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या ६, ७ आणि ८ नोव्हेंबर २०२० रोजी ‘प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे यंदा १२ वे पर्व असून सोलापूरकरांना गप्पांची दिवाळी यंदा प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरून ऑनलाईन अनुभवता येणार आहे. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन श्री. यतिन शहा व प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत यंदाच्या ‘प्रिसिजन गप्पा’बाबत माहिती दिली.
शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी ‘सुमन सुगंध’ ही सांगितिक मैफिल अनुभवायला मिळेल. आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांच्या ह्दयात अढळपद मिळविणार्या ख्यातनाम पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची प्रकट मुलाखत हे यंदाच्या प्रिसिजन गप्पांचं वैशिष्ट्य असेल. मंगला खाडिलकर यांनी उलगडलेला सुमनताईंचा सांगितिक प्रवास तर रसिकश्रोत्यांना पाहता येईलच. त्यासोबतच सुमनताईंनी अजरामर केलेल्या गाण्यांचा आनंद घेता येईल. माधुरी करमरकर, विद्या करलगीकर, मंदार आपटे हे कलावंत सुमनताईंची गाणी सादर करतील.
शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी दुसर्या दिवशी ‘माणिककन्यां’ सोबतच्या दिलखुलास गप्पा पाहता येतील. महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा यांच्या कलेचा वारसा त्यांच्या मुलींनी जोपासला आहे. या मुली म्हणजे वंदना गुप्ते, भारती आचरेकर, राणी वर्मा आणि अरूणा जयप्रकाश. या चौघींशीही उत्तरा मोने संवाद साधतील. अभिनय, गायन अशा विविध क्षेत्रांत मोठं योगदान देणार्या या चार बहिणींच्या रंगलेल्या गप्पा पाहणं ही एक वेगळीच पर्वणी असेल.
‘प्रिसिजन गप्पां’मध्ये दरवर्षी सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणार्या दोन संस्थांना गौरविण्यात येते. यंदाही तिसर्या दिवशी रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गातील गोपाळ डोंबारी समाजाचं आयुष्य बदलून टाकणार्या गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद (अनसरवाडा ता. निलंगा जि. लातूर) या संस्थेला यंदाचा ‘प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल. सन्मानचिन्ह व तीन लाख रूपये अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने श्री. नरसिंग झरे हे स्वीकारतील.
तसेच निराधार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्या प्रार्थना फाउंडेशन (सोलापूर) या संस्थेला यंदाचा ‘स्व. सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह व दोन लाख रूपये अशा स्वरूपाचा हा पुरस्कार संस्थेच्या वतीने अनु व प्रसाद मोहिते हे स्वीकारतील. पुरस्कार वितरणानंतर श्री. झरे, अनु व प्रसाद मोहिते यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यातून दोन्ही संस्थांनी उभं केलेलं मोठं सामाजिक काम उलगडेल. प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी श्री. माधव देशपांडे हे मुलाखतकार असतील.
रसिक सोलापूरकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ‘प्रिसिजन गप्पा’ एक तप पूर्ण करत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रसिकश्रोत्यांना घरबसल्या प्रिसिजन गप्पांचा मनसोक्त आनंद घेता यावा या उद्देशाने यंदा हा कार्यक्रम ऑनलाईन केला जात आहे. प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर https://m.facebook.com/PrecisionFoundationSolapur/?ref=bookmarks प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वाजता गप्पांना प्रारंभ होईल. तसेच इन सोलापूर न्यूज व येस न्यूज या चॅनल्सवरही तीनही दिवसांच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण सायंकाळी ६.२५ वाजताच होणार आहे. रसिकश्रोत्यांनी गप्पांची दिवाळी घरबसल्या मनसोक्त अनुभवावी असं आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे.