सोलापूर, दि.7- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र” असे नामकरण करण्याचा सोहळा गुरुवार, 9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता सामाजिकशास्त्रे संकुल सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. डॉ. जयंतराव बोधले महाराज यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश माने, प्र-कुलगुरु प्रा. डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. एस.के. पवार, ज्ञानस्त्रोत केेंद्राचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. गौतम कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.
डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. या कार्याची प्रेरणा सतत विद्यार्थ्यांसमोर राहावी या दृष्टिकोनातून विद्यापीठाच्या ग्रंथालयाला डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे नाव देण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्यातर्फे विद्यापीठाकडे सादर करण्यात आला. विद्यापीठाने या संदर्भात एक समिती नियुक्त करून त्या समितीच्या शिफारसीनुसार तसेच व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनुसार हा निर्णय घेतला.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यापीठाला या कार्यासाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. शिवाय डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्याशी संबंधित साहित्य ही विद्यापीठाला भेट दिले जाणार आहे. देणगीच्या रकमेतून विद्यार्थीभिमुख योजनांसाठी खर्च करण्याचे संपूर्ण अधिकार विद्यापीठाला देण्यात आले आहेत. हा कार्यक्रम ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात केला जाणार आहे. कोविडचे नियम पाळून कमी उपस्थिती राहणार असली तरी जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील खूप नागरिकांना हा कार्यक्रम https://youtu.be/tOkYH0fzVak या लिंकवरून पाहता येणार आहे.