महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींवर कन्नड संघट्नेच्या कार्यकर्त्यांनी फेकली शाई, उद्या बेळगाव बंदची हाक
बेळगाव : बेळगाव अधिवेशनाला विरोध करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना सोमवारी कन्नडीगांनी काळे फसले. त्यामुळे जनक्षोभ उसळला असून, मराठी भाषकांमध्ये याविरोधात तीव्र संताप आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा प्रश्न पेटणार आहे.
कर्नाटक विधानसभेचे आज बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाप्रश्न पेटला आहे.
बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा शांततेत पार पडत असताना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेक करून त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्यामुळे याच्या निषेधार्थ उद्या बेळगाव बंदची हाक पुकारण्यात आली. त्यामुळे उद्या संपूर्ण सीमाभागातील खानापूर तालुका, निपाणी तालुकासह अन्य सीमाभाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष मनोहर केनेकर यांनी दिली.
महाराष्ट्रात जाण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी सीमावासीयांनी व्हॅक्सिन डेपो येथे जनता महामेळाव्याचे आयोजन केले होते. याला मोठ्याने संख्येने महिलांवर्गही सहभागी झाला होता. मात्र यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परवानगी असताना देखील मंच काढण्याचा प्रयत्न चालविला मात्र यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी मंचावरच ठाण मांडून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी मंचाच्या मागील बाजूस दीपक दळवी गेले असता यांच्यावर शाहीफेक हल्ला झाला. याच्या निषेधार्थ उद्या बेळगाव बंदची हाक देण्यात आली.