नागपूर: विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना १८६ मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त १ मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे. अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा ११० मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना ३३१ तर भाजपचे उमेदवार खंडेलवाल याना ४४१ मते मिळाली आहेत.
या विजयानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टिका केली आहे. बावनकुळे म्हणाले कि, विधानपरिषद निवडणुकीत नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत असून, पटोलेंनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या हुकूमशाहीला काँग्रेसचे मतदार कंटाळले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मतदान केल्यामुळेच काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसची मते कुठे गेली? हे सांगण्याची गरज नाही असेही बावनकुळे म्हणाले.