ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात ‘अतिक्रमण’ काढण्याची मोहीम सुरू

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहरातील अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने अक्कलकोट नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला. ही मोहीम उद्यापासून आणखी तीव्र होणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन पाटील आणि पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले. अक्कलकोट शहर हे तीर्थक्षेत्र आहे.

या ठिकाणी दररोज हजारो भाविक हे स्वामी समर्थ दर्शनासाठी येत असतात अशावेळी अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्याचा त्रास वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना होत आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून अक्कलकोट शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, फळ विक्रते, गाडीवाले यांना अक्कलकोट शहरात आपले दुकानासमोर व रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून घेणेबाबत सर्व व्यवसायिक, व्यापाऱ्यांना चार दिवसांपूर्वी आवाहन करण्यात आले होते.परंतु दुकानासमोरील अतिक्रमण काढण्याबाबत व्यापारी यांनी अल्प प्रतिसाद दिल्यामुळे आज अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे व नगरपरिषद यांच्यावतीने सकाळी अकरा वाजल्यापासून अकोट शहरातील एसटी स्टँड ते विजय कामगार चौक या परिसरातील फळ विक्रेते, दुकानदार, हॉटेल मालक यांचे असलेले अतिक्रमण २० ते २५ व्यवसायिक यांनी स्वतः होऊन काढून घेतले तसेच पाच लोकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

या अतिक्रमण हटाव मोहिमेत पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व मुख्याधिकारी सचिन पाटील तसेच पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस नाईक धनराज शिंदे, अजय बहिरगुंडे,बिरणा वाघमोडे, राम चौधरी, सीताराम राऊत, चिदानंद उपाध्याय, अंबादास दूधभाते, प्रशांत कोळी, संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.

उद्या (मंगळवार )पासून प्रभावीपणे अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी सर्व व्यावसायिकानीं अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात यावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!