स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ देणार अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध,गरजूंना रोज दोन वेळचे जेवण ! श्री दत्त जयंती निमित्त संकल्प
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध, गरजूंना दैनंदिन दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आले असून याचा शुभारंभ दत्त जयंती, दि.१८ डिसेंबर २०२१, शनिवार रोजी होणार असल्याचे माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली.
गेली ३३ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज आणि त्यांचे सुपुत्र व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाने अन्नछत्र मंडळाच्या कार्यास झळाळी प्राप्त झाली आहे. येथे दैनदिन १५ ते २० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर दोन्ही लॉकडाऊन कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत ह्या न्यासाने शहर व ग्रामीण भागात अन्नदान सेवा सलग ८ व ७ महिने केली आहे. कोविड सेंटर मधील कोरोना रुग्णास सलग ६ महिने व ५ महिने दैनंदिन नाष्टा, चहा व जेवण पुरवठा केले आहे. तसेच शहरात सॅनिटायजर फवारणी करणे मोफत मास्क वाटप इ. उल्लेखनीय कार्य केले आहे. हे न्यास गरीब व गरजवंताना वैद्यकीय व शैक्षणिक मदत करीत असते.
त्याचप्रमाणे जळीतग्रस्त, भूकंपग्रस्त व पूरग्रस्तांना तातडीचा मदतीचा हात देते. १९९३ च्या किल्लारी येथील महाविनाशकारी भूकंपाचे वेळेस महिनाभर दररोज ट्रकभरून अन्न भूकंपग्रस्तांना पाठ्विनाय्त आले. तसेच २०१४ ला अक्कलकोट ग्रामीण भागातील खानापूर, तडवळ या भागातील पूरग्रस्तांना ८ दिवस पुरविण्यात आले. २०१९ ला सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना व २०२१ च्या पूर परिस्थितीत चिपळूण येथील पूरग्रस्तांना ट्रक भरून जीवनावश्यक साहित्य व अन्नधान्य शिधा पाठविण्यात आला. हे न्यास सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक, आरोग्य, पर्यावरणपुरक, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, आपत्कालीन व्यवस्थापन इ. उपक्रम सदैव राबवित असते.
लॉकडाऊनच्या कालवधीत न्यासाने अक्कलकोट शहरात जेव्हा अन्नदान केले त्यावेळेस असे लक्षात आले की अक्कलकोट शहरात बरेच गरजू,वृद्ध, अपंग, निराधार लोक आहेत. ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ही गोष्ट जेव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना समजली तेव्हा त्यांना वाटले की या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे. मग त्यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट शहरातील दिव्यांग, वृद्ध, गरजूंना दैनंदिन दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा शुभारंभ दत्त जयंती, दि.१८ डिसेंबर २०२१, शनिवार रोजी होत आहे.
समर्थ महाप्रसाद सेवेची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल :
1. अर्जदाराचे किमान वय ५० वर्ष पूर्ण असावे / दिव्यांगाना वयोमर्यादेमध्ये शिथिलता असेल.
2. व्यसनाधीन व्यक्तींचा विचार केला जाणार नाही.
3. अर्ज करणारी व्यक्ती कुठलेही काम करण्यास सक्षम नसावी.
4. अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये कुणीही कमावता नसावा.
अर्जदाराने फॉर्म भरून देताना पुढील कागदपत्रे जोडावी :
1. रेशनकार्ड / आधारकार्ड झेरॉक्स प्रत
2. कमीत कमी एक महिन्यापूर्वीचे ३ आय.डी. साईज फोटो.
3. अर्जावरती अर्जदाराची सही किंवा अंगठा
4. अर्जास कोणी शिफारस केले असेल तर शिफारस कर्त्याचे पूर्ण नाव व मोबाईल नं.
डबा सुरु करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल :
1. अर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ(ट्रस्ट) एफ/२२७९, अक्कलकोट ‘समर्थ महाप्रसाद सेवा’ लाभार्थींचे ओळखपत्र देण्यात आले आहे.
2. अन्नछत्र मंडळामध्ये जे स्वामीभक्त महाप्रसाद ग्रहण करतात तोच प्रसाद लाभार्थ्यांना देण्यात येईल.
3. व्यसन करणार्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. संस्थेने नेमलेल्या व्यक्तीकडून अर्जदाराची आर्थिक व इतर निकषानुसार चौकशी करूनच डबा चालू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल.
वरील सर्व बाबींची पूर्तता होऊन अन्नछत्र मंडळाचे स्वयंसेवक, जयहिंद फुड बँक व रॉबिनहुड आर्मीचे कार्यकर्ते वरील अर्जाची शहांनिशा करून अर्ज खरा आहे. याची खात्री पटल्यावरच त्या व्यक्तींना डबा सुरु करण्यात येईल.
वरील ‘समर्थ महाप्रसाद’ सेवेचे नियोजन करणेकामी लोकमंगल फौंडेशनचे सन्मा.श्री शहाजीराजे पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच अक्कलकोटमधील जयहिंद जयहिंद फुड बँकेचे अंकुश चौगुले, आतिश पवार, योगेश पवार, हिरालाल बंदपटटे, महेश निंबोळे व इतर त्यांचे कार्यकर्ते आणि रॉबिनहुड आर्मीचे देविदास गवंडी, अनंत क्षिरसागर, आशिष होंबे व कार्यकर्ते यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. अन्नछत्र मंडळाच्या ‘समर्थ महाप्रसाद’ सेवेचा शहरातील निराधार व गरीब-गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी ह्या पत्रकार परिषदेत केले.
ह्या पत्रकार परिषदेस अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, प्रवीण देशमुख, अंकुश चौगुले, योगेश पवार व न्यासाचे सर्व विश्वस्त, सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आणि जयहिंद फुड बँक आणि रॉबिनहुड आर्मीचे सदस्य उपस्थित होते.