अक्कलकोट, दि.१८ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती निमित्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता अलोट गर्दी केली. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर श्री गुरुदत्तात्रयांचे चौथे अवतार समजले जाणारे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त व्हावे याकरिता भाविक दत्त जयंतीला वटवृक्ष मंदिरात गर्दी करतात. दत्तजयंतीच्या पावन मुहूर्तावर कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामीदर्शन सुलभतेने होणे करिता भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले.
याप्रसंगी कोरोना नियमावलीचे पालन म्हणून मंदिरात प्रवेश करणाऱ्या स्वामी भक्तांना मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. सर्व स्वामी भक्तांना ठराविक अंतराने परंतु टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. अनेक स्वामी भक्तांनी आज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन धन्य झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषाने वटवृक्ष मंदिर परिसर व अक्कलकोट नगरी दुमदुमली. दत्त जयंती निमित्त राज्याच्या विविध भागातून पायी चालत आलेले पालखी व दिंडी सोहळे अक्कलकोटी विसावले. येणाऱ्या सर्व दिंडी व पालखी सोहळ्याच्या स्वामी भक्तांची दर्शनाची निवासाची व भोजन प्रसादाची व्यवस्था देवस्थानच्या भक्तनिवास येथे करण्यात आली होती.
दत्त जयंती निमित्त हेडगेवार रक्तपेढी सोलापूर व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १०७ भाविकांनी रक्तदान केले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, गिरीश पवार, प्रसाद सोनार, श्रीनिवास इंगळे, मंगेश फुटाणे, प्रा. शिवशरण अचलेर, नागनाथ गुंजले, आदींनी परिश्रम घेतले.