मुंबई : राज्यातील विविध विभागांतील परीक्षेचा मोठा घोटाळा आता उघड झाला आहे. आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरतीत घोटाळे झाल्याचे उघड होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधक करत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही त्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
तुकाराम सुपे यांच्या घरी 88 लाख, त्यांच्या मेहुण्याच्या घरी 1.5 कोटी व काही सोनं सापडणं हे अत्यंत धक्कादायक आहे. गेल्या काही दिवसांत वसुली सरकारच्या माध्यमातून परिक्षांमध्ये गोंधळ चाललाय पण महाराष्ट्रात असे कधीच झाले नव्हते. तेव्हा सरकारने या भ्रष्टाचाराचे प्रायश्चित करुन(1/2) pic.twitter.com/PADtfyzrmD
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 20, 2021
भरती परीक्षांमधील घोटाळे आणि त्यातून कमावलेले कोट्यवधी रुपये आता जनतेच्या नजरेसमोर आले आहेत. असे घोटाळे यापूर्वी महाराष्ट्रात कधी पाहिले नव्हते. पण हे सरकार आल्यापासून फक्त आणि फक्त वसुली सुरू असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे. आता याची गंभीर दखल घेत या प्रकरणांची चौकशी सीबीआयकडे सोपवावी. या घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधून काढायची गरज आहे, असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, याच मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही परीक्षा घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यांतील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.