ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! अक्कलकोटकर पितात कुरनूर धरणातून विषारी पाणी, लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अक्कलकोट,दि.२८ : कुरनूर धरणातील
पाणी विषारी करून अक्कलकोट शहरास व तालुक्यातील ५१ गावातील जनतेच्या जीवाशी खेळ खेळण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला आहे.मांगुर माशाला देशात बंदी असताना कुरनूर धरणालगत बऱ्हाणपुर हद्दीमध्ये हा प्रकल्प उभारून धरणातील पाणी दूषित केल्याने लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तब्बल दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.विशेष म्हणजे मत्स्य विभाग,अक्कलकोट नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाला याची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले
जात आहे.या प्रकरणाची संपूर्ण माहिती
सुरवसे वस्ती येथील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडून या प्रकरणाला वाचा फोडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. कारण कुरनूर धरणावर अक्कलकोट, मैंदर्गी,दुधनी यासह तालुक्यातील ५१ गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.कुरनूर धरणाच्या पश्चिम बाजूने बऱ्हाणपुर- कुरनूर हा जुना रस्ता जातो.त्या रस्त्याच्या लगत बर्‍हाणपूर येथील देवस्थानच्या इनामी जमिनी काही लोक कसतात तर धरणालगत काही संपादित जमीन आहे.या जमिनीत एका व्यक्तीने १५० बाय २०० लांबरुंद आणि ५० फूट खोल असे २५ शेततळे खोदले आहेत.मांगुर जातीचे विषारी मासे ज्या माशाच्या पालनावर किंवा उत्पादनावर महाराष्ट्रामध्ये बंदी आहे,असे मासे याठिकाणी सोडले
असून या माशांना खाद्य म्हणून सोलापूर येथील कत्तलखान्यातील जनावरांचे मांस, मेलेली जनावरे, यामध्ये कुत्रा मांजर, आदि प्राणी हे टेंपो द्वारे भरून आणून या शेततळ्याच्या एका बाजूला मिक्सर मशीन बनवलेली पाच हाॅसपाॅवर मिक्सर मशीनमधून या प्राण्यांचे लगदे करून ते त्या मांगुर माशांना खाद्य म्हणून वापरले जाते.या खाद्यामुळे ते मांगुर मासे काही दिवसातच दहा ते पंधरा किलोचे होतात त्यावेळी ते मांगुर मासे पकडून परराज्यात विक्रीसाठी पाठवले जातात आणि या पंचवीस शेततळ्यातील अत्यंत दूषित पाणी कुरनूर धरणात सोडले जाते आणि पुन्हा कुरनूर धरणातील पाणी या पंचवीस शेततळ्यात
भरून मांगुर माशाचे नवीन पिल्ले ही त्या शेततळ्यात सोडले जातात, हा प्रकार अतिशय धक्कादायक असून धरणात सोडले जाणारे दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्याला अतिशय घातक आहे.या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,
सभापती आनंदराव सोनकांबळे, युवक काँग्रेसचे
तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी समक्ष
पाहणी करून आसपासच्या शेतकऱ्यांशी
चर्चा केली असता त्या शेतकऱ्यांनी या
पंचवीस शेततळ्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात
आले असून हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात
झाले आहे.परिसरात मोठी दुर्गंधी आहे.अक्षरशा या लोकांना श्वास घेणे कठीण झाले असून त्या परिसरातून वारा जरी आला तरी सुद्धा त्या घाण वासाने लोकांना उलट्या होत आहेत.या गंभीर बाबीची दखल शासनाने घ्यावी,अशी मागणी मोरे यांनी केली आहे.यासंदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदार बाळासाहेब शिरसाट,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील,जिल्हा माहिती अधिकारी शिंगारे कुरनूर धरणाचे अधीक्षक अभियंता साळे यांचेकडे तक्रार केली आहे.या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, कुरनूरचे माजी सरपंच अमर पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित
होते.

हे प्रकरण गंभीर

सदरचे शेततळे सांभाळण्यासाठी आंध्र
प्रदेशातून लोक आणून त्यांना प्रत्येक शेततळ्यावर एक झोपडी उभारली आहे.ते आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दहशत दाखवून त्या परिसरात येऊ देत नाहीत.हे
प्रकरण गंभीर आहे.

आनंदराव सोनकांबळे,सभापती

अधिकाऱ्यांचे अक्षम्य
दुर्लक्ष

विशेष म्हणजे या धरणावर ती देखरेखीसाठी रखवालदार असताना हा प्रकार घडतो आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांची लोक धरणावर येत जात असतात तरी त्यांच्या लक्षात ही गंभीर बाब कशी आली नाही की संगनमताने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

दिलीप सिद्धे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी

 

जिल्हाधिकाऱ्यांना
भेटणार

एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या नावाखाली धरण सुधारण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत तर दुसरीकडे धरणाच्या लगत असा जीवघेणा गंभीर प्रकार सुरू असल्याने प्रशासन नेमके काय करते, असा आमचा सवाल आहे. यासंदर्भात शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची
भेट घेणार आहे.

आनंद तानवडे,जि.प सदस्य

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!