बेकायदा मांगुर प्रकल्पावर दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची कारवाई सुरूच; दोन टन मासे उध्वस्त,प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगूर प्रकल्पाची
कार्यवाही दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.या कारवाईमध्ये दिवसभर दोन टन मांगुर मासे उद्ध्वस्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान हे सर्व प्रकरण अनधिकृत आणि बेकायदेशीर असल्यामुळे पाटबंधारे विभागाला खडबडून जाग आली असून आता पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या शेततळ्याच्या शेतकऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याने आपणावर का दंडात्मक कारवाई करू नये असे या नोटिशीत म्हटले आहे.याबाबत संबंधित शेतकऱ्यांवर दंडात्मक किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते, यावर अजून शेतकऱ्यांचे उत्तर आले नाही,असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पहिल्या दिवशी सर्व एकोणीस तलावाचे बंधारे अंतर्गत फोडून सर्व पाणी एकत्रित करण्यात आले.त्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले.आज दिवसभरात दोन टन मासे पकडून तलावाच्या थोड्या अंतरावर बाजूला एका ठिकाणी मोठा खोल खड्डा खणून त्याठिकाणी मासे टाकून वरुन माती टाकून खड्डे बुजविण्यात येत आहे.मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त राजकुमार महाडिक यांच्यासह पोलीस पाटबंधारे विभागाचे अधिकारी बागवान तसेच कुरनूर धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांच्यासह सुरवसे वस्तीतील शेतकरी दिवसभर या मोहिमेत सहभागी झाले होते. या कारवाईच्या मोहिमेवर तहसीलदार बाळासाहेब शिरसट आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर हेदेखील बारीक लक्ष ठेवून आहेत.
जिल्हाधिकार्यांनी लक्ष
देण्याची मागणी
सोलापूर जिल्ह्यात मत्स्य विभागाची यंत्रणा अतिशय तोकडी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाईमध्ये त्यांची दमछाक होत आहे केवळ स्थानिक प्रशासनाची मदत मिळत असल्यामुळे ही मोहीम पुढे जात असल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रशासनासमोर आव्हान
हे सर्व तलाव खोदण्यासाठी तब्बल दोन महिने लागल्याची माहिती समोर येत आहे.आता ते उध्वस्त करण्यास देखील किमान पंधरा दिवसाचा कालावधी लागेल,अशी माहिती मिळत आहे.त्यामुळे उपलब्ध यंत्रसामग्री पाहता प्रशासनासमोर हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तलावात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.