ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेकायदा मांगुर प्रकल्पाबाबत कारवाईनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित !

 

अक्कलकोट, दि.१ : कुरनूर धरणालगतच्या बेकायदा मांगूर प्रकल्पाबाबत आता कारवाईनंतरही काही प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत.मुळात गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बिनबोभाटपणे चालूच कसा होता, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.
सुरवसे वस्ती येथील शेतकऱ्यांनी तसेच कुरनूर धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सरपंच अमर पाटील यांनी याबाबत तक्रार केली होती.त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प कसा बेकायदेशीर आहे व आरोग्याच्या दृष्टीने किती घातक आहे.याबाबतचे मुद्दे मांडल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या पत्रकार परिषदेला पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे,तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी उपस्थिती लावून हा प्रकल्प बेकायदेशीर असून तो जनतेच्या आरोग्यासाठी घातक आहे,अशा प्रकारची भूमिका ठाम मांडली त्यानंतर प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली.

हा विभाग जरी मत्स्य विभागाच्या अखत्यारित येत असला तरी पाटबंधारे विभाग काय करत होते ? असा देखील प्रश्न आहे.मिळालेल्या माहितीनुसार शेततळे खोदण्यासाठी दोन महिने गेले होते आता ते नष्ट करण्यासाठी देखील किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे.इतके सगळे बेकायदेशीर कृत्य याठिकाणी घडले आहे.धक्कादायक बाब म्हणजे या विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही,पाटबंधारे विभागाकडे विचारणा केली असता पाटबंधारे विभाग म्हणते आम्हाला काहीच माहिती नाही.त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा उत्तर भागात सुरू आहे.ज्यावेळी हा विषय माध्यमांमध्ये चर्चेला आला त्यावेळी मात्र तहसीलदार बाळासाहेब शिरसट, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी कठोर कारवाईची भूमिका घेऊन या बेकायदा प्रकल्पांबाबत कारवाईला सुरुवात केली.ही कारवाई सुरू करत असताना मत्स्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ देखील नव्हते.परंतु तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन ते उपलब्ध करून दिले.त्यानंतर आता गेल्या दोन दिवसापासून ही कारवाई सुरू झाली आहे.एकीकडे कुरनूर धरण पर्यटन क्षेत्र करण्याच्या हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे अशा प्रकारची कामे धरणाच्या लगत होत असल्याने पाटबंधारे विभागाच्या कारभारावरती शंका उपस्थित होत आहे.सुरूवातीला ज्यावेळी हे प्रकरण उजेडात आले.त्यावेळी एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू होते नंतर मात्र जबाबदारी निश्चित झाल्यानंतर कारवाईला गती आल्याचे चित्र दिसत आहे मुळात हा प्रकल्प बेकायदा आहे.देशात मांगुर जातीच्या माशांवर पूर्णपणे बंदी आहे असे असताना हा प्रकल्प सुरू होता याला नेमके अभय कोणाचे याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे.

अधिकाऱ्यांचे अक्षम्य
दुर्लक्ष

विशेष म्हणजे या धरणावर ती देखरेखीसाठी रखवालदार असताना हा प्रकार घडतो आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांची लोक धरणावर येत जात असतात तरी त्यांच्या लक्षात ही गंभीर बाब कशी काही आली नाही की संगनमताने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

दिलीप सिद्धे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी

 

जिल्हाधिकाऱ्यांना
भेटणार

एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या नावाखाली धरण सुधारण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत तर दुसरीकडे धरणाच्या लगत असा जीवघेणा गंभीर प्रकार सुरू असल्याने प्रशासन नेमके काय करते, असा आमचा सवाल आहे. यासंदर्भात शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची
भेट घेणार आहे आणि सखोल चौकशीची मागणी करणार आहे.

आनंद तानवडे,जि.प सदस्य

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!