राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्हा बँकेत भाजपने केला शिरकाव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी १४ मतांनी मिळवला विजय
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. गद्दारांना पराभूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना पराभूत केले आहे. कंद यांना ४०५ तर घुले यांना ३९१ मते पडली. या बँकेवर राष्ट्रवादीच वर्चस्व असले तरी कंद यांच्या रूपाने भाजपला एक अधिकृत जागा मिळाली आहे. दुसरीकडे तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी माजी मारली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी क वर्ग मतदार संघातून १४ मतांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेत भाजपने शिरकाव केला आहे. आघाडीचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून येऊनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सुरेश घुले यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे. हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत दांगट यांनी सुमारे १५ मतांनी विजय मिळवला
जिल्हा बँकेवर यापूर्वीच २१ पैकी १४ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ७ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणीस सुरुवात झाली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद सोबले यांनी प्रदीप कंद यांच्या विजयाची घोषणा करताच अल्पबचत भवनाबाहेरील कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले आणि विजयी जल्लोष करीत त्यांनी टाळ्या, शिट्ट्यांनी परिसर दणाणून सोडला.