पुणे : सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना २५ नोव्हेंबर रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काहीदिवसांपुर्वी त्यांच्यावर हर्नियाचं शस्त्रक्रिया करण्यात आला होता. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची तब्येत खालावली होती. मंगळवारी अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रज्यापाल भगतसिंह कोशीयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहीली आहे.
• “सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” : राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
• मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे
‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
• समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
• सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले : देवेंद्र फडणवीस
वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
• गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
• सिंधूताईंच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले : आ. सुधीर मुनगंटीवार
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.