२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच सुरुवात केली रणनीती, काँग्रेसपक्ष ऑनलाईन आणि अॅपवर देणार भर
दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर आगामी दोन वर्षात इतर राज्यातही निवडणुका होणार आहेत. त्या नंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसपक्ष ऑनलाईन आणि अॅपवर भर देणार आहे. सोशल मिडीयाद्वारे जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे. त्यासाठी काँग्रेसने राहुल गांधीच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवले आहेत.
या व्हॉट्सअॅप ग्रुपची थिम “राहुल/आरजी कनेक्ट” अशी आहे. देशातील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेस आता सोशल मिडीया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सोशल मिडीया आणि ऑनलाईन सक्रीयता वाढवण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येत आहेत. सोशल मिडीया आणि व्हॉट्सअॅपद्वारे लोकांशी सक्षमपणे कनेक्ट होण्यासाठी काँग्रेस या नव्या तंत्राचा वापर करणार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप आरजी कनेक्ट २०२४ या नावाने लॉन्च करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याद्वारे पक्षाचा प्रचार आणि राजकीय संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. पक्षाकडून सोशल मिडीयावर राज्यस्तरीय ग्रुप बनवण्यात येणार आहे. त्यानंतर विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत ते पोहचवण्यात येणार आहेत.
पक्षातील सक्रीय सदस्यांना या ग्रुपमध्ये सहभागी करण्यात येणार आहे. पक्षाच्या रणनीती आणि धोरणानुसार ते मतदारांशी संपर्कात राहतील. राहुल कनेक्ट थिमद्वारे काँग्रेस पक्ष सोशल मिडीयावर सक्रीयता वाढवणार आहे. व्हॉट्सअॅप प्रमाणेच पक्षाकडून फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही असेच ग्रुप बनवण्यात येणार आहेत. जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडीया सक्षम माध्यम असल्याने २०२४ च्या निवडणुकीसाठी याचा वापर करण्यासाठी काँग्रेसने आतापासून तयारी सुरू केली आहे.