कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिवकुमार यांच्यासह ६३ काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल, भाजपा आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला “हा” आरोप
बंगळुरु : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. कोरोना वाढत असतानाच कर्नाटकात काँग्रेस नेते मेकेदाटु प्रकल्पाचे काम लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढत आहेत. या पदयात्रेमुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. भाजपा आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडीओ ट्विट करत कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांच्यावर टीका केली आहे. डी. के. शिवकुमार मद्यधुंद अवस्थेत पदयात्रेत सहभागी झाल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिवकुमार यांच्यासह ६३ काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Congress, which claims to own the legacy of Mohandas Karamchand Gandhi, has D K Shivkumar, its regional chieftain doing a Padyatra in an inebriated condition. This is not only the worst possible way to do a Padyatra but also an insult to Gandhi ji and his sacred Padyatra! pic.twitter.com/uqxs4tpu01
— Amit Malviya (@amitmalviya) January 10, 2022
अमित मालवीय यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये गर्दीमध्ये काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते अडखळत चालत असल्याचे दिसते. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे. महात्मा गांधींची परंपरा असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतो. मात्र, त्यांचे नेते मद्यधुंद अवस्थेत पदयात्रा करत असल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत पदयात्रा करणे हा महात्मा गांधी आणि त्यांच्या पवित्र पदयात्रेचा अपमान असल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे. ही पदयात्रा काढण्यात आल्याप्रकरणी कर्नाटक सरकारने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्यासह ६३ काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहे. कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणे आणि गर्दी जमवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची रॅली रामनगरमध्ये पोहचली आहे. रॅलीसाठी भरपूर गर्दी झाली असून लोकांनी मास्कही घातलेले नाहीत. या पदयात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून निरा शेने भाजप ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. मेकेदाटु प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदयात्रा काढणाऱ्या काँग्रेसच्या ६३ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हे दाखल करण्याने आम्ही घाबरणारे नाहीत. आम्हाला घाबरवता येईल, असे भाजप सरकारला वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे, असेही ते म्हणाले.
या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात गुन्हा का दाखल केला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थीत केला आहे.