मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आता सलमानने शेजाऱ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केल्याची बातमी आहे. सलमानने मुंबईच्या दिवाणी न्यायालयात पनवेल येथील फार्म हाऊसजवळील जमिनीच्या मालकाविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
सलमानने केलेल्या दाव्यानुसार, पनवेल येथील त्याच्या फार्महाऊस जवळ असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कड यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून आपली बदनामी केली आहे, असा आरोप त्याच्या दाव्यात करण्यात आला आहे.
या दाव्यात व्हिडीओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. तसंच, ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. या माध्यमांनी अशा प्रकारच्या अपमानकारक आशयाला ब्लॉक करावं आणि हटवून टाकावं, असे निर्देश देण्याची विनंती सलमानने याचिकेतून केली होती.
या याचिकेवर शुक्रवारी दिवाणी न्यायाधीश अनिल लद्दाद यांनी सुनावणी केली. हा खटला प्रलंबित असेपर्यंत संबंधित जमीन मालकाने कुठलीही बदनामीकारक विधाने करू नयेत यासाठी न्यायालयाने अंतरिम आदेश द्यावा, अशी विनंती सलमानने केली होती. मात्र, त्याची ही विनंती मुंबईतील दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायाधीशांनी जमीन मालक कक्कडला सलमानच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.