ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर विद्यापीठ आणि सोशल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार, सोलापूरच्या ब्रॅण्डिंगचा प्रमुख हेतू; मार्केटिंग होणार

सोलापूर,दि.16- सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची उत्पादने, स्थळे आणि व्यक्ती यांची माहिती जगभरात पोहोचावी आणि त्याद्वारे सोलापूरचे ब्रॅण्डिंग व्हावे, या उद्देशाने सोलापूर सोशल फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, सोलापूर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, प्रभारी कुलसचिव श्रेणीक शाह, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी .एस .कांबळे, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, प्रा.नरेंद्र काटीकर सोलापूर सोशल फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमोडे, विपुल लावंड, पुरुषोत्तम कारकल आदी उपस्थित होते .

याप्रसंगी बोलताना आमदार देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी महाराष्ट्रात खूप आघाडीवर होता. सोलापूर जिल्ह्याची आजही अनेक वैशिष्ट्ये असून ती देशभरातच नव्हे तर जगभरात ठाऊक असणे गरजेचे आहे. सोलापूरचे देशात आणि जगभरात ब्रॅण्डिंग होऊ शकेल, ही या सामंजस्य करारामागची संकल्पना आहे.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठांमध्ये अनेक नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी विद्यापीठही शिक्षण, संशोधन, नवोपक्रम यासारख्या विविध माध्यमातून प्रयत्न करीत आहे. विद्यापीठातल्या सुविधांचा उपयोग सोलापूर जिल्ह्याच्या ब्रँडिंगसाठी व्हावा व या कार्यात विद्यापीठालाही काही सहभाग घेता येत आहे, याचा विद्यापीठाला आनंद आहे. सोलापूर जिल्ह्याचे ब्रँडिंग करण्यासाठी विद्यापीठाला जे करणे शक्य आहे ते आम्ही निश्चित करू.

या सामंजस्य करारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची उत्पादने स्थळे आणि व्यक्ती यांच्या संदर्भात प्रथम माहिती  घेतली जाईल. सोलापूर जिल्ह्यांचे ब्रॅण्डिंग करण्याच्या उद्देशाने प्राधान्याने जी माहिती सर्वांसमोर मांडणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठातील रेडिओ व टिव्ही स्टुडिओच्या माध्यमातून संकलित करून तो प्रसिद्ध करण्यात येईल. या कराराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, महत्वाची उत्पादने तसेच आपल्या अभूतपूर्व कार्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींची माहिती या उपक्रमाद्वारे देशभरात आणि जगासमोर मांडण्याचा संकल्प याद्वारे करण्यात आलेला आहे. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती याबाबतचा आराखडा निश्चित करून पुढील उपक्रमांची अंमलबजावणी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!