सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा आज कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱयांनी मंगळवारी लिलाव बंद ठेवला आहे. गेल्या 15 दिवसांतील ही दुसऱयांदा कांद्याची विक्रमी आवक झाली असून, देशात उच्चांकी असल्याचे सांगण्यात येते.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सुमारे 900 कांद्याचे ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याची विक्रमी आवक झाल्याने सदरचा कांदा भुसार विभागात उतरविण्यात आला आहे. आवक विक्रमी असली तरी कांद्याचा दर मात्र 1200 ते 2500 दरम्यान स्थिर आहे. सोलापुरातील कांदा हा देशभर पाठविला जातो.
प्रामुख्याने दक्षिण हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. पंधरा दिवसांपूर्वी याचप्रकारे जवळपास 1100 हून अधिक कांद्याचे ट्रक लिलावासाठी बाजार समितीत आले होते. त्यामुळे व्यापारी अधिकारी व हमाल तोलरांचीही तारांबळ उडाली होती.
दरम्यान, कांद्याचे दर स्थिर राहावेत व कांदा लिलाव सुरळीतपणे व्हावा, यासाठी कांदा व्यापाऱयांनी 25 जानेवारी रोजी लिलाव बंद ठेवला आहे.