उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रतनजीत प्रताप नारायण सिंह म्हणजेच आरपी एन सिंह यांचा ही नाव आहे. हेच आरपी एन सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी म्हणजेच 25 जानेवारीला त्यांचा भाजप प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. पक्ष प्रवेश झाल्यानंतर लगेचच सिंह यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. सिंह यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आरपी एन सिंह हे उत्तर प्रदेशातील वजनदार राजकीय नावां पैकी एक आहे. कुशी नगर इथल्या सैंथवार राजघराण्यातील आरपी एन सिंह हे भाजपमध्ये सामील होणार असल्याने काँग्रेसची डोकेदुखीदुखी आणखी वाढणार आहे.
दै. संकेतस्थळावर या बाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. आरपी एन सिंह यांच्यावर काँग्रेसने काही राज्यांचे प्रभारी पदही सोपवलं होतं. मात्र गेले काही महिने ते काँग्रेसमध्ये फारसे सक्रीय दिसत नव्हते. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला फार आधीपासून सुरू केला होता. या भेटीगाठींमुळे ते काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. आरपी एन सिंह यांना पडरौनाचे राजा म्हणून ओळखलं जातं. भगवान गौतम बुद्धाने अखेरचे जेवण याच पडरौनामध्ये केलं होतं असं सांगितलं जातं. यामुळे कुशीनगर जिल्ह्यातील पडरौना बरंच प्रसिद्ध आहे.
सिंह यांनी पत्रकार सोनिया सिंह यांच्याशी लग्न केलं असून त्यांना 3 मुली आहेत. सिंह यांचे वडील सी.पी. एन. सिंह हे कुशी नगरचे खासदार होते आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना संरक्षण राज्यमंत्री बनविण्यात आले होते. उत्तर प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने आणि खासकरून सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे, अशा मतदार संघांसाठी जवळपास सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत.
काँग्रेसनेही इतरांप्रमाणे त्यांचे उमेदवार घोषित केले होते. यातील 3 उमेदवार हे उमेदवारी मिळाल्या नंतरही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. काँग्रेसच्या सुदैवाने यातला एक उमेदवार पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाला आहे. उत्तर प्रदेशात सत्तेपासून 3 दशके दूर असलेली काँग्रेस इथे पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करते आहे. यासाठी काँग्रेसने बऱ्याच विचार मंथनानंतर आपले उमेदवार निश्चित केले होते. युसूफअली यांना काँग्रेसने चमरौआ मतदार संघातून उमेदवारी दिली होती. उमेदवारी मिळाल्या नंतरही ते समाजवादी पक्षात सामील झाले.
अली यांना समाजवादी पक्षाकडून आपल्याला चमरौआ मतदार संघातून उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. या मुळे दु:खी झालेल्या युसूफ अली यांनी पुन्हा काँग्रेसची वाट धरली होती. स्वार-टांडा नावाच्या मतदार संघातून काँग्रेसने हैदर अली खान उर्फ हमजा मियां यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी मिळाल्या नंतरही ते काँग्रेसचा कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भाजपमध्ये सामील झाले. भाजपने त्यांना लगेच आपला सहकारी पक्ष असलेल्या अपना दलतर्फे त्यांना उमेदवारी देऊन टाकली. बरेली कँट मतदार संघातून काँग्रेसने सुप्रिया ऐरन यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी समाजवादी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि बरेली कँट मतदार संघातूनच उमेदवारी मिळवली.