आगामी काळात दत्ता शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळ देईल : टोपे ; धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याला सदिच्छा भेट
अक्कलकोट : गोकुळ परिवाराचे व्हिजन चांगले आहे. त्यामुळे आगामी काळात चेअरमन दत्ता शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बळ दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याला त्यांनी सदिच्छा भेट देऊन कारखान्यातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची माहिती घेऊन पाहणी केली. त्यानंतर आयोजिलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील साखर कारखानदारी सांभाळणारा पक्ष आहे. त्यात विशेष करून अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्याना मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद कारखानदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. यातूनच कारखानदारी क्षेत्राला मोठे बळ मिळत आहे.
या पुढच्या काळात शिंदे यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून ताकद देणार असून त्यांनी पुढे जाऊन याचा विस्तार करून या भागातील जनतेचे प्रश्न सोडवावेत.दत्ता शिंदे यांच्याकडे दूरदृष्टीकोन व संयम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांची वाटचाल आणखी वेगाने होईल.त्यायासाठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेत.शिंदे परिवाराने कापड आणि लॉटरी व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येऊन साखर कारखानदारीच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांनी उभारलेला कारखाना हा आदर्शवत केला आहे. तो अनुकरणीय आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनेक वेळा कौतुक केले आहे म्हणून आपण
या कारखान्यावर स्वतः येऊन पाहणी केली असल्याचे ते म्हणाले.
दत्ता शिंदे, कपिल शिंदे आणि विशाल शिंदे हे तिन्ही तरुण होतकरू आणि धाडसी आहेत त्यांच्या पाठीशी आपण राहावे आणि या भागाचा विकास करून घ्यावा,असेही ते म्हणाले.राज्य सरकार कोरोना परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी सातत्याने दूर करत आहे. कोरोना मृत्यू दरही कमी झाला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग जातीने लक्ष देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना चेअरमन दत्ता शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कारखान्याची वाटचाल भक्कमपणे सुरू आहे व योग्य दिशेने देखील सुरू आहे. हा कारखाना जिल्ह्यामध्ये एफआरपीच्या बाबतीत नंबरवन ठरला आहे.शेतकऱ्यांना साथ देऊ.आगामी काळात राजकीय भूमिकेच्यादृष्टीनेही आपण लवकरच चांगले पाऊल टाकून हा पक्ष बळकट करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, शिंदे परीवार मोठ्या धाडसाने कारखानदारीत यश मिळवले आहे. त्यांच्याबरोबर चव्हाण परिवार पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ते यापुढच्या काळात देखील तुळजा भवानीकारखाना व गोकुळ शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित चांगल्या प्रकारे साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी आरोग्य मंत्री टोपे यांनी कारखान्यातील प्रत्येक विभागाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊन पाहणी केली.त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले.
याप्रसंगी व्यासपीठावर तुळजाभवानी युनिटचे प्रमुख सुनील चव्हाण कार्यकारी संचालक कपिल शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हाद काशिद, विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ, बाळासाहेब दिघडे, अमरसिंह क्षीरसागर, सी. एस उमरदंड, तहसीलदार अमोल कुंभार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, कार्तिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केले तर आभार नारायण चव्हाण यांनी मानले.
दत्ता शिंदेना अडचण भासू देणार नाही
दत्ता शिंदे हे राष्ट्रवादीचे झाल्यानंतर त्यांना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. तशी कल्पना आम्ही पक्षनेतृत्वालाही दिली असून आता त्यांनी एक पाऊल पुढे यावे, असे सूचक विधानही त्यांनी शिंदे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर बोलताना केले.