पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनात 34 पॉईंटची झाली वाढ! ‘बी प्लस प्लस’ ग्रेड प्राप्त; (सीजीपीए 2.96 गुण)
सोलापूर, दि.31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दुसऱ्या नॅक मूल्यांकनात 34 पॉईंटची वाढ होऊन ‘बी प्लस प्लस’चा (B++) ग्रेड प्राप्त झाला आहे. पुनर्मूल्यांकनानुसार विद्यापीठास सीजीपीए 2.96 गुण प्राप्त झाले असून अल्पकालावधीत ग्रेड वाढल्याने राज्यात आपल्या विद्यापीठाची प्रतिमा उंचावल्याची भावना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पहिले नॅक मूल्यांकन 2015 ला झाले होते. त्यावेळी नॅककडून बी ग्रेड मिळत सीजीपीए 2.62 गुण मिळाले होते. त्यानंतर आता 2015-16 ते 2020-21 चे सहा वर्षांमधील नॅक पुनर्मूल्यांकन झाले. यामध्ये विद्यापीठास चांगले गुण प्राप्त झाले आहेत. ‘बी प्लस प्लस’ ग्रेड विद्यापीठास प्राप्त झाला आहे. अल्पावधीतच ‘ए ग्रेड’च्या जवळ विद्यापीठ पोहोचले आहे. ए अथवा ए प्लस मानांकन प्राप्त करणारी इतर विद्यापीठे कमीत कमी पन्नास वर्षे जुनी आहेत. त्या पार्श्वभूमीवर या विद्यापीठाने मिळवलेले हे यश निश्चितच स्पृहणीय आहे. ए ग्रेडसाठी विद्यापीठास केवळ 0.04 पॉईंट कमी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट, त्यात विविध समस्या व अडचणींशी मात करीत विद्यापीठाने चांगली प्रगती साधल्याचे मत आलेल्या नॅक समिती सदस्यांकडून व्यक्त झाले आहे.
आता विद्यापीठाचा ग्रेड वाढल्यामुळे विविध स्तरावरून विद्यापीठास फायदा होणार आहे. इन्क्रिमेंटल वाढ, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत मिळणाऱ्या निधीमध्येही यामुळे वाढ होणार आहे. अल्पकालावधीत मिळालेल्या या ग्रेडमुळे राज्यात विद्यापीठाची प्रतिमा उंचावली असल्याची भावना कुलगुरू कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सर्व संबंधित घटकांच्या परिश्रमामुळे विद्यापीठाला हे यश प्राप्त झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन गुण वाढले आहेत. बहुतांश विद्यापीठांचे गुण कमी झाले आहेत. त्या तुलनेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घवघवीत यश प्राप्त केल्याने शिक्षण क्षेत्रातून या विद्यापीठाचे कौतुक होत आहे.
अल्प वयाच्या विद्यापीठाची चांगली भरारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना 2004 ला झाली असून या विद्यापीठाने केवळ 17 वर्षे कालावधीमध्ये चांगली भरारी घेतल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दुसऱ्या नॅक मूल्यांकनात विद्यापीठास प्राप्त झालेला ‘बी प्लस प्लस’चा दर्जा हा प्रगतीच्या दृष्टीने खूप मोठा बहुमान असल्याची भावना शिक्षण तज्ञांकडून व्यक्त होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये विद्यापीठात खूप मोठी प्रगती साधली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळेच विद्यापीठाला चांगला दर्जा प्राप्त झाला आहे.