पुणे : राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळांसोबत ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई , नागपूर, पुणे या शहरामध्ये ‘परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत विद्यार्थी रस्त्यावर आले होते. यानंतर ऑनलाईन परीक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह तयार झाला होता. मात्र, यावर बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुरुवारी पुण्यात देखील बोर्डाने दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, यामध्ये परीक्षेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आणि मार्गदर्शनाकरिता शिक्षण विभागातर्फे हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षेला सर्वच विद्यार्थ्यांचा विरोध आहे असे अजिबात नाही. परीक्षेला आणखी वाढीव वेळ देणे यासह अन्य पावले उचलून ऑफलाइन परीक्षा अधिक सुटसुटीत करणे शक्य आहे.