पंजाब : ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘महाभारत’ या मालिकेमध्ये त्यांनी पाच पांडवां पैकी एक असणाऱ्या ‘भीम’ ची भूमिका साकारली होती. मूळचे पंजाबमधील असलेल्या प्रविण कुमार सोबती यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाभारत’ या मालिकेतील त्यांची ‘भीम’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली होती. मात्र गेल्या काहीकाळापासून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. सोशल मीडियाद्वारे त्यांनी मदतीचे आवाहनही केले होते.
कलेच्या दुनियेमध्ये येण्यापूर्वी प्रविण कुमार यांनी क्रीडा क्षेत्रातही हात आजमावला होता. हॅमर आणि डिस्कस थ्रो या खेळांमध्ये त्यांनी नाव कमावले होते. आशियाई खेळांमध्ये त्यांनी २ सुवर्णपदक, एक रौप्यपदक आणि एक कांस्यपदकाची कमाई केली होती. आशियाई आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये पदक जिंकून त्यांनी देशाचे नाव जगाच्या पटलावर गाजवले होते. खेळातील अलौकिक कामगिरीसाठी त्यांना मानाचा ‘अर्जुन’ सन्मानही मिळाला होता.