माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नातेवाईकाच्या कंपनीला कोस्टल रोडचे काम, भाजप आमदार अतुल भातखळकरांची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार
मुंबई : सध्या तुरुंगवासी असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक सत्यजित देशमुख यांच्या इनोव्हेव कंपनीला कोस्टल रोड आणि वर्सोवा- वांद्रे सि लिंक प्रकल्पाचे उप- सल्लागार बनवून गेल्या दोन वर्षात त्यांना ठाकरे सरकारने 20 कोटींचे पेमेंट केले आहे. या कंपनीला शून्य अनुभव असताना सरकारने केलेली उधळण जनतेच्या पैशाची लूट असून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी याविरुद्ध केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केली आहे.
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या नातेवाईकाच्या कंपनीला शून्य अनुभव असताना कोस्टल रोड आणि सी लिंक प्रकल्पात सल्लागार म्हणून वर्णी. २ वर्षात ठाकरे सरकारने घातला सुमारे २० कोटी रुपयांचा रतीब. pic.twitter.com/aQ80qB1KxC
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 11, 2022
कोस्टल रोडच्या वाढत्या खर्चाबाबत अलीकडेच कॅगने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. वारेमाप लूट केल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला असून जनतेच्या पैशाची सत्ताधारी पक्ष वारेमाप लूट करीत आहेत. कॅगने याबाबत मुंबई महापालिकेला जाबही विचारला आहे.
मंत्री आणि नेते स्वतःच्या तुंबड्या भरून घेत असताना नातेवाईकांच्या नावानेही पैसा ओरबडत असून राज्याला खड्ड्यात घालत आहेत. या प्रकाराबाबत सविस्तर चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहून केली आहे.
तात्या सरकारमध्ये सामील असलेल्या तिन्ही पक्षांच्या सामुहिक खाबुगिरीमुळे एका बाजूला प्रकल्पांचे खर्च प्रचंड वाढत असून दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेल्या कंपन्यांमुळे प्रकल्प रेंगाळत आहेत. या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास भ्रष्टाचारांच्या पर्दाफाश होईल, असे मत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केले आहेत.