पुणे : उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं आज निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंकार करण्यात येणार आहे. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता.
राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. तसेच त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण पूर्ण केले होते.
राहुल बजाज हे आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे मागील दोन महिन्यांपासून दाखल होते. वयोमान आणि त्याचवेळेस हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजता त्यांचं रुबी हॉल क्लिनिकमधे निधन झालं.
गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.