पौरोहितांच्या मंत्रोच्चारात स्वामींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात, निर्गुण पादुका गाभाऱ्यात पुनश्च स्थानापन्न,अनेक मान्यवरांची हजेरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२७ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या मुळ गाभाऱ्यातील स्वामी समर्थांच्या
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व निर्गुण पादुकांची स्थानापन्नता विधीवत धार्मिक सोहळयांनी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी हजारो भाविकांनी
दर्शन घेतले.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे,आमदार आशिष शेलार, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रविकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, युवानेत्या शितल म्हेत्रे, नगरसेवक अशपाक बळरोगी, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शिवराज स्वामी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी मंदिर समितीच्यावतीने
समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रमुख मान्यवरांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.
गेल्या चार दिवसापासून स्वामींच्या या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त वास्तुशांती रक्षोज्ञा होम, शुद्धिकरण पूजा, मयूरासन मूर्ती प्रतिष्ठापना, बिंबशुद्धी, प्रतिष्ठापना याग, नवग्रह प्रतिष्ठायाग, गुरुशांती, कलश, आभिषेक, गणयाग, मूर्ती प्रतिष्ठापना, पंचदुर्गा नमस्कार, नवचंडी याग, शांती, चक्रपुजा, रुद्रयाग, मंडल आराधना, एकादशी रुद्रयाग
या धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर आज स्वामींच्या मुख्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी उडपीचे मुख्य पुरोहित राघवेंद्र भट व सहकाऱ्यांच्या विविध मंत्रोच्चारात सकाळी ६ वाजता अतिरुद्र पारायण तर सकाळी ७ वाजता मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते स्वामींच्या निर्गुण पादुका मुळ गाभाऱ्यात पुनश्च स्थानापन्न करण्यात आल्या. सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामीभक्त नरेंद्र हेटे, अमेय हेटे, मंजिरी हेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समितीचे चेअरमन इंगळे, रूपाली इंगळे, प्रथमेश इंगळे कुटुंबीयांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्री स्वामी समर्थांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा महारुद्राभिषेक संपन्न झाला.यादरम्यान मुळ गाभाऱ्यातील शिवलिंगास मंदार पुजारी व पौरोहितांच्या हस्ते मुकुट परिधान करून स्वामींची मुर्ती सजविण्यात आली. यानंतर हेटे परिवार व आमदार शेलार परिवाराकडून समर्थांची आरती संपन्न झाली.
सकाळी ११:३० च्या नैवेद्य आरतीपूर्वी स्वामी मुद्रेची प्रसन्न पूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी एक वाजता फलमंत्राक्षते विधी संपन्न होऊन गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला स्वामींचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यानंतर उडपीतील पौरोहित्य राघवेंद्र भटांच्या हस्ते स्वामी भक्त अमेय हेटे, मंजिरी हेटे, प्रवीण टकले, विजू टकले, नरेंद्र सोनवळकर, नाना वेदक यांनी स्वामी सेवेत केलेल्या विशेष सहकार्याबद्दल श्रींची सेवा आरती, फळांचा प्रसाद व श्रीफळ गौरव प्रसाद देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोहित मोहनराव पुजारी,सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वला सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, सागर गोंडाळ, गिरीश पवार, शिवशरण अचलेर, मच्छिंद्र सावंत, बसवराज आलमद, शांतलिंगप्पा आलमद, दिपक जरिपटके, बालाजी सोमवंशी, नागनाथ गुंजले, सचिन पेटकर, श्रीपाद सरदेशमुख, अक्षय सरदेशमुख, महादेव तेली आदींनी परिश्रम घेतले.
भक्ती संगीताने
सोहळ्याची सांगता
याप्रसंगी पुनश्च एकदा मुळ गाभाऱ्यातील स्वामी दर्शनाचा हजारो स्वामी भक्तांनी लाभ घेतला व दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.या कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पुण्यातील प्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रमाने या प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता झाली.