अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु, सदगुरुंचे गुरु, त्रैलोक्याचे नाथ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज
यांचा महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान. या मंदिरातील वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी अनेक भाविकांना मार्गदर्शन करत त्यांच्या जीवनातील संकटांचे तारणहार बनले आहेत त्यामुळे गुरुस्थान म्हणून स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या या वटवृक्ष मंदिराकडे पाहण्याचा भाविकांचा दृष्टिकोन वेगळा आहे.म्हणून या स्थानाला महत्व आहे.आज असंख्य स्वामीभक्त भर पावसातही स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केल्याने गुरु-शिष्य भेटीची ओढ काय असते याची प्रचिती आज गुरूपौर्णिमेदिवशी मंदिर समितीसह समस्त अक्कलकोटकरांनी अनुभवली. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजनीय दिवस, अशा या पूजनीय दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देत असून आज दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ झाले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता काकड आरती तर दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न झाली. पहाटे ५ वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. कालपासून संततधार सुरू असलेल्या पाऊसामुळे स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरातील शेडमध्ये करण्यात आली होती. संततधार भर पाऊसात देखील सकाळी ७ नंतर भाविकांची रांग नवशा मारुती मंदिरापर्यंत तर सकाळी ११ वाजता फत्तेसिंह चौकापर्यंत लांबली होती. ती सायंकाळी ४ वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्या टफ्याने दर्शनास सोडण्यात आले. गुरूपौर्णिमेनिमित्त स्वामी प्रसाद म्हणून देवस्थानच्या वतीने भाविकांना देण्यात येणाऱ्या भोजन महाप्रसादाचा दुपारी १२ ते ३ या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे असंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरूपौर्णिमेनिमीत्त आज अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार शिवशरण बिराजदार, सोलापूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेश परदेशी आदी मान्यवरांसह अनेक स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, रवी मलवे, प्रा.शिवशरण अचलेर, चंद्रकांत सोनटक्के, मोहन शिंदे, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, रवि कदमसागर गोंडाळ, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, शिवाजी यादव, महेश मस्कले, मनोज जाधव, अमर पाटील, संतोष पराणे व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.