अबब ! काय ती अक्कलकोट नगरपालिका… कुरनूर धरण,भीमा नदी ओव्हर फ्लो तरीही आठ दिवसाड पाणी ! धरण उशाला कोरड घशाला, अक्कलकोटकरांची अवस्था
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२० : एकीकडे कुरनूर धरण दोन महिन्यापासून ओव्हरफ्लो आहे दुसरीकडे भीमा नदीमुळे तालुक्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे असे असताना अक्कलकोट शहराला मात्र आठ दिवसाड पाणीपुरवठा सुरू असल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. याबाबत ना प्रशासनाला गांभीर्य आहे ना कोणाला या विषयाची चर्चा सध्या अक्कलकोटमध्ये सुरू आहे.
अक्कलकोट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार योजना आहेत असे असताना शहरामध्ये मात्र ऐन सणासुदीच्या काळामध्ये पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये हंगामी स्वरूपात पाणीटंचाई असते परंतू अक्कलकोट हे राज्यात असे एक शहर आहे ज्या शहरात बारा महिने पाण्याची टंचाई असते. याकडे आत्तापर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. वास्तविक पाहता मागच्या वीस वर्षाचा जर इतिहास पाहिला तर वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करून दूरदृष्टीकोनातून एखादी मोठी पाणीपुरवठा योजना राबविता आली असती परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे होऊ शकले नाही. आजही तीच परिस्थिती आहे. कुरनूर, हिळळी, हालचिंचोळी आणि सांगवी अशा चार योजना सध्या अस्तित्वात आहेत यापैकी केवळ कुरनूर योजनेतून ४० लाख लिटर पाण्याचा उपसा रोज होतो. सांगवीमधून कधीतरी गरजेनुसार पाणी उपसा होतो. हालचिंचोळी आणि हिळळी तर सध्या बंदच आहेत. विशेष म्हणजे कुरनूर धरणातून हजारो क्युसेक पाणी हे कर्नाटकात वाहून जात आहे.
अक्कलकोट शहराच्या अगदी पाच ते सात किलोमीटर अंतरावरती बोरी नदी आहे. पाणी पाहून लोकांना आश्चर्य वाटते. दुसरीकडे उजनी धरणातून येणारे पाणी हे हिळळी बंधाऱ्याद्वारे वाया जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. सगळीकडे पावसाचे आणि पाण्याचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे.अक्कलकोट शहरामध्ये मात्र पाण्याचा ठणठणाट दिसत आहे ही विदारक परिस्थिती बदलणार तरी कधी ? असा सवाल अक्कलकोटमध्ये विचारला जात आहे. याबाबत प्रशासनाशी विचारणा केली असता लाईट सुरळीत नसल्याचे उत्तर दिले जाते. अधिक माहिती घेतली असता कुरनूर धरणावर एक्सप्रेस फिडर लाईन कार्यान्वित झाली तर पाणीपुरवठा तीन ते चार दिवसाड होऊ शकतो असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हे जरी झाले तरी एक दिवसाड किंवा रोज पाणीपुरवठा होऊ शकत नाही. सुरळीत वीज पुरवठा झाल्यानंतर चार दिवसाड पाणी मिळू शकते, इतकी भयावह स्थिती आहे. राज्यात इतर शहराच्या तुलनेमध्ये अक्कलकोट शहराचा पाणी प्रश्न खूपच बिकट आहे आणि गंभीर आहे. विशेष म्हणजे अक्कलकोट शहर हे स्वामी समर्थांमुळे जगभर नावारूपाला आले आहे.
राज्यभरातून रोज हजारो भाविक अक्कलकोटला येतात अशा स्थितीमध्ये पाणीटंचाई असणे ही बाब दुर्दैवी आहे. यापूर्वी अक्कलकोटला अनेक वेळा टँकरने पाणीपुरवठा झाला आहे.तेव्हापासून आजपर्यंत पाण्याची समस्या कायम आहे.या ठिकाणी दूरदृष्टीकोनातून आगामी १५ ते २० वर्षाचा विचार करून एखादी मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणण्याची गरज आहे.सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आहे.अक्कलकोट नगरपालिकेतही भाजपची सत्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन योजना मंजूर करून आणून हा पाणी प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी केली जात आहे.
एक्सप्रेस फिडर लाईन मंजुरीच्या प्रतीक्षेत
कुरनूर धरणावर एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे तो प्रस्ताव अजूनही धुळखात आहे.हा प्रस्ताव मंजूर कधी होणार आणि ही लाईन कधी ओढली जाणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. याला मंजुरी त्वरित मिळाल्यास शहराचा पाणी प्रश्न काही अंशी सुटू शकतो.