अक्कलकोट, दि.२० : शेतक-यांचे प्रश्न केवळ शिवसेनाच सोडवू शकते,इतरांना अजिबात कळवळा नाही त्यांच्या नादी अजिबात लागू नाका, असे आवाहन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोकीळ यांच्या उपस्थितीत नागणसुर येथे शेतक-यांचा मेळावा आयोजित करण्यात आले होता. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे या मेळाव्याचे आयोजन केले होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, तालुकाप्रमुख संजय देशमुख, प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांच्या उपस्थितीत नागणसुर शाखेचे उदघाटन झाले. बुक्कानुरे म्हणाले की, उजनी धरणातून दोन टीएमसी पाणी अक्कलकोट तालुक्यासाठी आरक्षित असून हे काम अपूर्ण असल्यामुळे जिल्ह्यातील वजनदार नेते आपल्या हक्काचे पाणी त्यांच्या तालुक्यासाठी वापरत आहेत. आपल्या हक्काचे पाणी व दरवर्षी उजनी धरणातून सोडलेले पाणी तसेच पावसाचे वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी ‘गाव तेथे तलाव’ व ‘गाव तेथे बंधारे बाधावे’ अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
उजनी धरणातून भीमा नदीद्वारे कर्नाटकात वाहुन जाणारे पाणी देगाव कालव्याद्वारे प्रत्येक गावातील तलावात टाकून अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलाव भरण्यात यावे, तालुक्यातील प्रत्येक गावातील बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे, देगाव कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,असे तालुका प्रमुख देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाउपप्रमुख संतोष पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, सोपन निकते, तालुका महिला संघटीका वर्षा चव्हाण,शिक्षकसेना तालुकाप्रमुख प्रा.इरण्णा धानशेट्टी, कृष्णा रजपुत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर गावातून भगवी रॅली काढण्यात आली.
यावेळी श्रीशैल स्वामी,महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली हावनूर ,रेखा यादव ,मल्लिनाथ खुबा विनोद मदने, विश्वनाथ कोगनुर, शिवानंद कोळी, अनिल इंगळे, बसवराज हिप्परगी, सिध्दाराम गुरव,बसवराज सोलापूरे,अप्पाशा माळी आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.कडबगावकर यांनी केले तर आभार धरेप्पा तोळणुरे यांनी मानले.