सोलापूर – सोलापुरात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जंम्बो कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी आणि सोलापूरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली.
सोलापूरचे संजय तुकाराम सरवदे यांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विष्णू बरगंडे, प्रकाश शिंदे, विशाल कल्याणी, अंकुश राठोड आणि आशिष परदेशी यांची शिवसेनेचे उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर विभाग प्रमुख म्हणून राजू बिडला यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब दिलीप निकम हे मंगळवेढा तालुका युवा सेनेचे प्रमुख असतील. अमोल गायकवाड माढा तालुका युवा सेनेचे प्रमुख म्हणून काम पाहतील. तर दीपक खटकाळे हे सांगोला तालुका युवा सेनेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत .उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले संजय सरवदे हे संभाजी आरमारचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
युवा सेनेच्यासुद्धा निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत .सांगोलाचे सागर सुभाष पाटील हे युवा सेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख राहणार आहेत. सोलापूर महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक उमेश ईश्वर गायकवाड यांच्यावर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर सोलापूर, संपूर्ण शहर आणि मंगळवेढा असे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. तसेच माढ्याचे प्रियदर्शन साठे हे युवा सेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख असून त्यांचे कार्यक्षेत्र माढा, करमाळा आणि सांगोला असे राहील. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केलेले सागर शितोळे यांच्यावरसुद्धा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि बार्शी हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. युवा सेनेचे शहर प्रमुख म्हणून अर्जुन शिवसिंगवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी सेनेचे कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख म्हणून सोलापुरातील सुजित दत्तात्रय खुर्द यांची निवड करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, चरणराज चवरे, महेश चिवटे तसेच शहर प्रमुख मनोज शेजवाल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆ राज्यभर विस्तार होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यभरात विकासात्मक कामाच्या माध्यमातून पाऊल टाकण्यात येत आहे. राज्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे. आगामी काळात शिंदे गटाच्या माध्यमातून राज्यभर विकास कामांचा जोर आणखीनच वाढणार आहे. सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विविध योजना साकारण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहणार आहे .सर्व क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे सांगतानाच नूतन पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेऊन आपापल्या भागात बांधणी करावी असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.