नाशिक : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याजवळ बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला मागून येणाऱ्या एका वाहनानं धडक दिली होती. त्यानंतर बसला आग लागली. त्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतामध्ये एक बालकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविले जात आहे.
जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा बसमध्ये ३८ प्रवाशी प्रवास करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस स्लीपर कोच असल्यानं बसमधील अनेक प्रवाशी पहाटे झोपलेले होते. त्यामुळं आग लागल्यानं प्रवाशांना बाहेर निघायला वेळ न मिळाल्यानं अनेक प्रवासी होरपळले. त्यात ११ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाक्याजवळ बसला आग लागल्याची घटना समोर येताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर बचाव पथकानं बसमधील प्रवाशांना तातडीनं बाहेर काढलं, त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.