दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज सकाळी न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सरन्यायाधीशपदी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची घोषणा केली आहे. न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे ५० वे सरन्यायाधीश असतील. त्यांच्या नावाची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्याकडून सरन्यायाधिशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता उदय लळीत यांनी पुढच्या सरन्यायाधिशपदासाठी न्या. चंद्रचूड यांच्या नावाची केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. त्यामुळं केंद्रानं लळीत यांची शिफारस मान्य केली तर काही महिन्यांतच सुप्रीम कोर्टाला तिसरे सरन्यायाधीश मिळतील. न्यायमूर्ती ललित हे पुढच्या महिन्यात निवृत्त होत असल्यानं त्यांनी केंद्राला पत्र लिहून उत्तराधिकाऱ्याच्या नावाची सूचना केली आहे.
न्या. चंद्रचूड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ते एका मराठी कुटुंबात जन्मले त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यानंतर ते नवी दिल्लीतही शिकत होते. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी गणित आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर याच विद्यापीठातून ते LLB झाले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून LLM ही पदवी मिळवली. तसंच त्यांना हार्वर्ड विद्यापीठाने न्यायशास्त्र विषयाचा जोसेफ बेले पुरस्कार देऊन गौरवले. न्यायशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडीही केली.
बॉम्बे हायकोर्टात वकिली करत असताना चंद्रचूड यांनी रिझर्व्ह बँक, ONGC, अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मार्च 2000 मध्ये बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर 2013 ते अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती झाले. मे 2016 ला ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.
सध्याचे सरन्यायाधीश उदय लळीत यांना केवळ ७४ दिवसांचाच कार्यकाळ मिळाला आहे. परंतु आता न्या. चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदासाठी निवड झाल्यास त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. कारण ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होणार आहेत. २०१६ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये ऐतिहासिक निकाल दिलेले आहेत.