दांडिया महोत्सवामुळे महिलांच्या कला गुणांना वाव : व्हट्टे ; अक्कलकोट येथे अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनचा उपक्रम
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.११ : महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनने हा एक मंच तयार करून दिला आहे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे,असे मत जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट येथे अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सवाच्या उद्घटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मनिषा माळशेट्टी, जिल्हा परिषद महिला बालकल्याणच्या माजी सभापती स्वाती शटगार, अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या अध्यक्षा लक्ष्मी सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा शितल सिद्धाराम म्हेत्रे, इंडियन मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी दातार आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना व्हट्टे म्हणाल्या की, कमी वेळात महिलांसाठी दांडिया महोत्सव आयोजित केला त्याला अक्कलकोटकरांनीही भरभरून प्रतिसाद देत एक हजार महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली हे पाहून खूप आनंद झाला, असेच वेगवेळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे. अम्मा सुवर्ण लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून अक्कलकोट शहर व तालुक्यातीलमहिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचे काम करणार, असे मत अध्यक्षा लक्ष्मी म्हेत्रे यांनी व्यक्त केले.
दांडिया महोत्सवाचे आयोजन वयोगट दहा ते वीस (किशोरी गट), वयोगट वीस ते तीस (तरूणी गट) व वयोगट तीस च्या पुढील (खुला गट) अशा तीन गटात करण्यात आला होता.
विजेत्यांची नावे : उत्कृष्ट वेशभूषा – साक्षी हिंडोळे, अर्पिता चव्हाण, प्रियांका अजगुंडे
उत्कृष्ट नृत्य – राणी कुंभार, भक्ती धरणे, सलोनी शहा या सर्व विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पडवळकर यांनी केले.