ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाड पागे शिफारशीमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर,दि.12 : सफाई कामगारांच्या योजनांची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांनी करावी. लाड पागे समितीच्या शिफारशीमधील सफाई कामगारांची पदभरती आणि इतर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा संबंधित यंत्रणांनी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम 2013 जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला समिती सदस्या आमदार प्रणिती शिंदे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, राकेश निळकंठ यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

बैठकीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या योजना, मुलांची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत सदनिका, सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत चर्चा करण्यात आली. सफाई कामगारांच्या घराबाबत मनपाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सदस्य बालय्या मंडेपू यांनी केली. यावर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी याबाबत सोलापूर मनपाने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

आमदार श्रीमती शिंदे यांनी लाड पागे समितीच्या शिफारशीची त्वरित अंमलबजावणी करून सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली. श्री. शंभरकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांनी आपापल्या स्तरावर रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!