न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांनी वेगवेगळी मतं नोंदवल्याने ‘’हिजाब प्रकरण’’ विस्तारीत खंडपीठाकडे वर्ग
दिल्ली : कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलात हिजाबवर घातलेल्या बंदीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी विस्तारीत खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया या न्यायाधिशांच्या बेंचनं यावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद ऐकून घेतले. परंतु दोन्ही न्यायाधिशांनी या प्रकरणात वेगवेगळी मतं नोंदवल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी विस्तारीत खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली.
सुप्रीम कोर्टात सुनावणी करताना न्या. हेमंत गुप्ता म्हणाले की, याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात ११ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं हिजाब बंदीविरोधातील याचिका फेटाळून लावण्यात याव्यात, याशिवाय कर्नाटक हायकोर्टानं दिलेला निकाल योग्य असल्याचं मत न्या. गुप्ता यांनी व्यक्त केलं. तर न्या. सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय दिला. न्या. गुप्ता यांच्या निकालाला न्या. धुलिया यांनी असहमती दर्शवल्यानं हे प्रकरण तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आला.