ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा – शरद पवार

मुंबई दि. १६ ऑक्टोबर – अंधेरी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. शरद पवार यांनी आज सायंकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेत अंधेरी पोटनिवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे मुरजी पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला होता याची आठवण शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांना यावेळी करुन दिली.

स्वर्गीय रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका मांडली, मात्र भाजप निवडणुकीतून माघार घेण्यास तयार होत नाही. प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रार करण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाल्या त्यावेळी अशी भूमिका घेण्यात आली नाही. याचे कारण आताची ही निवडणूक दीड वर्षासाठी होत आहे. यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वर्ष- दीड वर्षासाठी निवडणूक घेणे टाळता येईल तर बरे होईल. गोपीनाथ मुंडे यांच्यावेळी पोटनिवडणूक घेण्यात आली तेव्हा पावणे पाच वर्षाचा कालावधी होता असेही शरद पवार यांनी सांगितले.

अंधेरी पोटनिवडणूकीबाबत सर्व परिस्थितीचा विचार करता अर्ज मागे घेण्यासाठी अजून कालावधी आहे. त्यापूर्वी ही भूमिका मांडली आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला नाही. त्यांना कोर्टात जावे लागले. मुंबई महानगरपालिकेने त्यावेळीच योग्य निर्णय घेतला असता तर त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली नसती परंतु वेगळी भूमिका मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे कोर्टात जावे लागले. कोर्टाने निर्णय देऊन मुंबई महानगरपालिकेला योग्य संदेश देत योग्य रस्ता दाखवला असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

बीसीसीआय आणि एमसीए निवडणूका होत आहेत. खेळामध्ये आम्ही कोणी राजकारण आणत नाही, राजकीय भूमिका घेत नाही. ज्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष असताना नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री असल्याने उपस्थित रहात होते. एमसीए ही चांगली संघटना आहे. देशामध्ये राज्य संघटना म्हणून एमसीए ही प्रभावी संघटना म्हणून कार्यरत आहेत. या संघटनेचे साधारणतः ४०० सदस्य असतील पण यापैकी कुणीही राजकारण यामध्ये आणत नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हिमाचल प्रदेशची निवडणूक लागली पण गुजरातची निवडणूक लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करताना निवडणूक आयोगाने सगळ्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या असत्या तर निवडणूक आयोगाच्या कामाबाबत ज्या शंका घेतल्या जातात. त्या शंका घेतल्या गेल्या नसत्या. निवडणूक आयोग ही स्वतंत्र मताची संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत कोणती शंका उपस्थित होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. तशी जबाबदारी निवडणूक आयोग व प्रशासनाची सुद्धा आहे हेही शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!