विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, ‘’या‘’ बँक घोटाळ्या प्रकरणी होऊ शकते ईडी चौकशी
मुंबई : राज्याचे विरोधिपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा दावा सुरिंदर अरोरा यांनी याचिकेत केला होता. शिखर बँकेतून २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केली गेली असा आरोप सुरिंदर अरोरा यांनी केला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून संचलाक मंडळ बरखास्तीची कारवाई करण्यात आली होती. तसंच चौकशीचे आदेश आरबीआयने दिले होते.
या आधी आर्थिक गुन्हे विभागाकडून सांगण्यात आलं होतं की, अजित पवार आणि इतर ७६ जणांविरोधात कारवाईसाठी ठोस पुरावे आढळले नाहीत. त्याबाबत आर्थिक गुन्हे विभागाने अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र मूळ तक्रारदाराने निषेध याचिका दाखल केली आणि ईडी अहवालाच्या आधारे पुढील तपास सुरू केला असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार आणि इतर नेत्यांविरोधात ठोस पुरावे सापडले नसल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता.