मोठी बातमी..! उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा, भाजप उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेणार
मुंबई : मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीला एक नवा ट्विस्ट आला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती केली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सि. टी. रवी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यात एक बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून घोषणा केली. ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.