बारामती : आम्हाला राष्ट्रवादीचे आमदार येऊन भेटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच केले होते. प्रत्येक पक्षाकडे आपला पक्ष वाढवण्यासाठी एक रणनीती असते. शिवसेनेतील फुटीमुळे आम्हाला अजिबात आनंद झालेला नाही. सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडखोरी नंतर राज्याचा विकास आणि धोरणांवर कोणी बोलतच नाही. हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक धोकादायक काळ आहे. कुठल्याही स्थितीत सत्ता कशी मिळवता येईल? याचाच विचार होत आहे. मग ते साम, दाम, दंड असो की केंद्रीय यंत्रणांचा दबाव. त्या मुळे आता शिवसेनेनंतर पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
मी स्वतः पवार घराण्याचा सदस्य आहे. परंतु राजकारणातील घराणेशाहीचे मी समर्थन करत नाही. शिवसेनेत मोठी फूट पडली, पण त्या ४० बंडखोर आमदारांच्या मनात काय आहे? हे कोणीही सांगू शकत नाही. बंडखोर आमदार परत येतील असे वाटत होते. खरंतर बंडाचा हा डाव एक महिना किंवा दोन महिन्यां पूर्वीचा नसावा. हा डाव जवळपास एक ते दीड वर्षांपूर्वीचा असावा, असा दावा रोहित पवारांनी केला.
आता आमच्या पवार घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असे विरोधकांना वाटते. शिवसेनेनंतर विरोधकांचे पुढचे टार्गेट आम्ही असू शकतो, असे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी म्हटले आहे.