मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१८ : पूर्वीच्या काळीरा मप्रहरी वासुदेव घरोघरी जाऊन टाळवा जवत अभंग, भक्तीगीते गात असत अगदी त्याच संकल्पनेनुसार अक्कलकोट येथील रोहित सुतार या तरुणांनी आपल्या व्यवसायात प्रगती करून उदरनिर्वाहाच्या संधीचे सोने करून घेतले आहे. या आधुनिक वासुदेवाची सध्या अक्कलकोट शहर आणि परिसरात चर्चा सुरू आहे.
घरच्या आर्थिक बिकट परिस्थितीमुळे शालेय जीवनापासून पेपर टाकणाऱ्या अक्कलकोट येथील रोहित सुतार याने श्रीस्वामी गीतांच्या गजरात नागरिकांना दूध, दही, ब्रेड, बटर, टोस्ट, साबणे, फिनेल, झाडू, खराटे, वर्तमानपत्रे अशा सकाळच्या गरजेच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय सोचोटीने करीत करून एक आदर्श तरुण पिढी समोर उभा केला आहे.
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले अरिहंत ऑटो सर्विस मध्ये मोटरसायकल मेकॅनिकची नोकरी स्वीकारली या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून कुटुंबास आधार झाला सायकलवरून पहाटे पेपर टाकण्याचे काम सुरूच होते.पेपरच्या कामातून रक्कम मिळत होती पण पहाटेपासून सायकलवरून पेपर टाकणे व नंतर रात्रीपर्यंत गाड्या दुरुस्तीचे काम करून दमछाक होत असे, म्हणून अरिहन्त ऑटो सर्विसचे मालक निखिल मेहता यांच्या सहकार्याने छोटी मोपेड घेतली व पेपर टाकण्याचे काम त्यावर सुरू केले.
पेपर टाकत असताना अक्कलकोट परिसरातील नागरिकांच्या सकाळच्या गरजा लक्षात घेतल्या व त्यानुसार दूध,दही,ब्रेड,खारी टोस्ट,फिनेल,साबण, झाडू,खराटे इत्यादी वस्तूंची या छोट्याशा गाडीवर व्यवस्थित मांडणी करून सकाळी विक्री करणे सुरू केले. हे करत असताना रोहितला लोकांना आवाज देणे अथवा हाका मारणे आवडत नाही त्यामुळे त्यांनी एक शक्कल लढवली व आपल्या गाडीला गाणे ऐकण्यासाठी स्पीकर्स
व त्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा बसविली आहे. रोज सकाळी मोठ्या आवाजात स्वामी गीते लावून तो अक्कलकोट येथील बॅगेहल्ली रोड, समतानगर, विश्वनगर, शिक्षक कॉलनी बँककॉलनी, शिवाजीनगर जेऊर रोड आदी परिसरात फिरून नागरिकांना सकाळी लागणाऱ्या सर्व वस्तूंची व पेपरची विक्री करत असतो.या त्याच्या गाण्याचे मधुर बोल ऐकून लोक बाहेर येतात व त्यांना लागणाऱ्या जिवनावश्यक वस्तूंची खरेदी त्याच्याकडून करत असतात. स्वामी गाणी ऐकून नागरिकांची मने प्रसन्न होतात.
पहाटे पाच ते साडेनऊ वाजेपर्यंत हे काम तो करतो त्यानंतर पुन्हा दिवसभर अरिहंत ऑटो सर्विसमध्ये मेकॅनिकचे काम करतो व आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो.आपल्या लहान भावाला उच्चशिक्षित बनविण्याचे त्याचे स्वप्न आहे. येणाऱ्या काळात स्वतः आधुनिक यंत्रणेसह बेकरी पदार्थ उत्पादित करून ते सर्व दूर वितरित करण्याचा व्यवसाय करण्याचा
त्याचा मानस आहे.
रोहितचा आदर्श घेण्यासारखा
सकाळच्या वेळी स्वामीगीते, भक्तिगीते लावून दूध, दही, बेकरी पदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा आम्हास करतो त्यामुळे आमची सोय होते.सकाळी सकाळी गीतांचे बोल कानी पडले की छान वाटतं व तो आलाय हेही कळतं, प्रत्येक तरुणांनी रोहितचा आदर्श घेतला तरी एक सुदृढ पिढी निर्माण होऊ शकते – शितल मोरे, शिक्षिका व रहिवासी समर्थनगर