अक्कलकोटमध्ये म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांना मिळाले खमके ‘गॉडफादर’;सत्तेसाठी आगामी निवडणुकांमध्ये होणार तीव्र संघर्ष
मारुती बावडे
अक्कलकोट : आता अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातील निवडणुका या चुरशीच्या ठरण्याचे संकेत मिळू लागले आहेत कारण या दोघांनाही केंद्रात आणि राज्यात खमके ‘गॉडफादर’ मिळाल्याने दोघांनाही हत्तीचे बळ मिळाले आहे.
दिवाळी संपताच निवडणुकीचा मोसम सुरू होणार आहे. त्यातच नुकतीच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची झालेली निवड म्हेत्रे यांना बळ देणारी ठरली आहे. कुठलाही एखादा नेता जेव्हा पुढे जातो तेव्हा त्या नेत्याला त्या पक्षाचा प्रमुख नेता किंवा पक्षाचा अध्यक्ष हा नेहमी बळ देत असतो. तेव्हाच त्या नेत्याची क्रेझ ही जनतेमध्ये वाढत असते आणि त्याचे प्रतिबिंब हे निवडणुकीमध्ये उमटत असते. आमदार कल्याणशेट्टी यांच्या बाबतीतही तसेच आहे कल्याणशेट्टी यांचा भाजपमधला राजकीय प्रवास पाहता त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले बळ पाहता ते भाजपमध्ये आता भक्कम स्थितीत आहेत. फडणवीस यांचे जवळचे आमदार म्हणून कल्याणशेट्टी यांची ओळख निर्माण झाली आहे. सध्या शिंदे – फडणवीस यांचे सरकार आहे. त्यात त्यांना फडणवीस यांचे पाठबळ असल्याने त्यांच्या राजकीय प्रवासाला गती मिळाली आहे. हे एकीकडे खरे असले तरी दुसरीकडे माजी मंत्री म्हेत्रे हे देखील मुरब्बी राजकारणी आहेत. अनेक वर्षे ते मंत्रीमंडळात राहिले आहेत. २५ ते ३० वर्षाच्या त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांनी अनेक नेते पाहिले आहेत. केंद्रापासून राज्यापर्यंत काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी त्यांचाही अनेक नेत्यांबरोबर संपर्क राहिला आहे. या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चांगली ताकद दिल्यामुळे पक्ष वाढला गेला. या पुन्हा आज घडीचा विचार करता खरगे यांची निवड ही म्हेत्रे यांना नुसती ताकद देणारी नव्हे तर उत्साह वाढविणारी आहे. पूर्वीपासूनच काँग्रेस पक्षामध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि म्हेत्रे यांचे जवळचे संबंध राहिले आहेत. खरगे यांच्यामुळे म्हेत्रे यांना काँग्रेसमध्ये मोठे पाठबळ मिळेल यात शंका नाही. या निवडीच्या पार्श्वभूमीवर म्हेत्रे यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होत आहे.
सध्या राज्यात आलेल्या शिंदे – फडणवीस यांचे सरकार पाहता काँग्रेसमध्येही त्यांना रोखण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यामध्येही भाजपचे प्राबल्य कायम राहावे यासाठी युवा नेतृत्व म्हणून फडणवीस यांनी कल्याणशेट्टी यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.दोन्ही गोष्टी योगा योगाने पुढे येत असल्या तरी त्या राजकीय दृष्ट्या एकमेकांना फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात खरगे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याने आता पुन्हा म्हेत्रे यांच्यावर पक्ष वाढीची जबाबदारी येते की काय याबाबतही पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच बाजार समिती यांच्या निवडणुका होणार आहेत. यात कल्याणशेट्टी यांना मिळालेले जिल्हाध्यक्षपद असो की काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदावर खरगे यांची झालेली निवड असो या म्हेत्रे व कल्याणशेट्टी यांना कितपत फायदेशीर ठरतात हे आगामी काळातच कळू शकेल पण सध्या तरी मतदारसंघात कल्याणशेट्टी यांच्या विरुद्ध म्हेत्रे हा सामना कायम राहणार आहे. भाजप मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे तर काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे.
या पक्षाला मोठा वैभवशाली राजकीय इतिहास आहे.पण मागच्या काही वर्षांत काँग्रेसची झालेली अवस्था अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षाला आता काँग्रेसच्या जुन्या इतिहासात रमून चालणार नाही, त्यांना वस्तुस्थिती लक्षात घेऊन मतदारांचे लक्ष वेधून म्हेत्रे यांच्या सारख्या नेत्यांवर पक्ष नेतृत्वाची जबाबदारी देण्याची गरज आहे,अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे.
दोघांचाही गॉडफादरशी थेट कॉन्टॅक्ट !
तालुक्यातील दोन्ही मातब्बर नेते हे आपापल्या गॉडफादरशी थेट कॉन्टॅक्टमध्ये आहेत.त्यामुळे सत्ता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने दोघेही तीव्र प्रयत्नशील राहणार हे तर नक्की आहेच. पण या सर्व विषयाचे राजकीय दृष्ट्या आगामी निवडणुकीत काय परिणाम दिसतील हे पाहावे लागेल.