बंधुत्वाचा संदेशाने पंढरपूर-घुमान पुन्हा नातं तयार होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायकल, रथयात्रेचा झेंडा दाखवून शुभारंभ
पंढरपूर, दि. 4 : संत नामदेव महाराजांनी चालत जावून भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. विश्व, बंधुत्वाचा संदेश दिला. या संदेशाला सायकल व रथ यात्रेतून उजाळा मिळणार आहे. त्यांचा बंधुत्वाचा संदेश आणि भागवत धर्माचा विचार या यात्रेतून घुमानपर्यंत पोहोचणार आहे. यनिमित्ताने पंढरपूर-घुमान यांचे पुन्हा एकदा नाते तयार होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
शासकीय विश्रामगृह येथे भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंढरपूर ते घुमान सायकल व रथ यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, आचार्य तुषार भोसले, संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास, शिंपी समाज अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष संजय जवंजाळ, राजेश धोकटे, सुनील गुरव, गणेश जामदार, सूर्यकांत भिसे आदि उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, घुमान येथे 2015 साली 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. यामधून नामदेव महाराजांचे विचार मांडण्यात आले होते. आता पुन्हा उजळणी होणार आहे. नामदेव रायांचा संदेश, विचार घेवून जाणाऱ्या रथयात्रेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
ही सायकल व रथयात्रा संत नामदेव रायांच्या 752 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भागवत धर्माच्या केलेल्या कार्याचा उजाळा म्हणून आयोजित केली असून, ती दि. 4 ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत चालणार आहे. रथयात्रेमध्ये दोन रथ, 110 सायकली, एक कार सामील आहे. शिवाय रथयात्रेमध्ये 50 वर्षांच्या पुढील 15 महिला, 95 पुरूष सामील झाले असून ते रोज 100 किमीचा प्रवास करणार आहेत. हा भारतातील अनोखा उपक्रम आहे.
वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव महाराजांना मोठा मान आहे. महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात फिरून भागवत धर्म, समता, बंधुता याची शिकवण दिली होती. यामुळेच शिखांच्या धर्मग्रंथामध्ये देखील महाराजांचे अभंग आहेत. नामदेवरायांनी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब मध्ये पायी धर्मप्रचार केला. त्याच रस्त्यावरून सदर सायकल दिंडी जाणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
28 नोव्हेंबर 2022 रोजी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चंदीगड येथील राजभवनामध्ये रथयात्रेचा समारोप होणार आहे.
◆ 4 राज्ये 2 हजार 300 किमीचा प्रवास
या सायकल व रथयात्रेचा संपूर्ण प्रवास 2 हजार 300 किमी. असून रोज शंभर किमी अंतर सायकलपटू पार करणार आहेत. रथामध्ये नामदेवराय यांची मूर्ती व पादुका असणार आहेत. दिंडीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रात्री भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.