सोलापूर, दि.7 : भारत निवडणूक आयोग यांच्याकडून प्रत्येकवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेवून अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करून त्रुटी विरहित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनाकांवर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
ग्रामसभेमध्ये अस्तिवात असेलेली मतदार यादी गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/ तपासण्यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आलेली असून या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. नागरिकांनी मतदार यादीमध्ये नोंदी तपासून घ्याव्यात. गावातील मतदार यादीमध्ये नोंदणी झालेल्या मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही सुरु असल्याने मतदारांनी त्यांचा आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संबंधित बीएलओ यांच्याकडे द्यावेत. मतदार यादीमधील नोंदणीबाबत हरकती, नोंदीमध्ये दुरुस्ती व नवीन नाव नोंदणी करावयाची सुविधा ग्रामसभेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रामसभेमध्ये मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होवून बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी, लग्न होवून गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे तसेच 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी, ज्याचे 1 ऑक्टोबर, 2023 पर्यंत 18 पूर्ण होणार आहेत, त्याच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
10 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.