ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा होणार बंद? राज्य सरकार घेणार एक-दोन दिवसांत निर्णय

मुंबई । देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई-दिल्लीमधील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो.

दिवाळीच्या आधीच दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिल्लीत काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता मुंबईतही काळजी बाळगली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजीव कपूर यांच्या माहितीनुसार दिल्ली-मुंबई प्रवासामुळे कोरोनाचा फैलाव मुंबईत वाढू शकतो. त्यामुळे या मार्गावरील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद करण्यासाठीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांशी चर्चा करून लवकरच याबाबतचा आदेश जारी केला जाऊ शकतो. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!